Saturday, September 14, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायतची मासिक बैठक पुन्हा तहकूब

टाकळीभान ग्रामपंचायतची मासिक बैठक पुन्हा तहकूब

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य मंडळाची बैठक काल कोरमअभावी तहकूब करण्याची नामुष्की आली. राष्ट्रीय सण 15 ऑगस्टच्या नियोजना संदर्भात आयोजित बैठकीलाही सदस्य दांडी मारीत असल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजात सदस्य उदासीन असल्याने कोरमअभावी पुन्हा एकदा मासिक बैठक तहकूब करण्यात आली. 17 पैकी 12 सदस्यांनी दांडी मारल्याने इतिवृत्तात त्या सदस्यांची गैरहजेरी नोंदवून बैठक तहकूब केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांनी दिली.

टाकळीभान लोकसंख्येने मोठे गाव असून येथील ग्रामपंचायतची सदस्य संख्या 17 आहे. मात्र काल झालेल्या सदस्य मंडळ बैठकीस सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्य दीपक पवार, अशोक कचे, सुनील त्रिभुवन असे 5 सदस्य उपस्थित होते. तर 12 सदस्य बैठकीस गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण न झाल्याने बैठक तहकूब करण्यात आली.

टाकळीभान ग्रामपंचायतचे सदस्य आपली सदस्यपदाची जबाबदारी झुगारुन मासिक बैठकांना दांडी मारीत असल्याने ते गावगाडा चालविण्यास असमर्थ असल्याने दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात जवळपास 10 बैठका कोरम अभावी तहकूब केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी घटनेने मासिक बैठकीचे आयुध सदस्यांना दिलेले असले तरी सदस्यांची वारंवार मासिक बैठकांना दांडी मारणे हा गावाच्या विकासाविषयी चिंतेचा विषय झाला आहे.

सत्ताधारी गटाच्या कार्यकाळात एकूण 28 मासिक बैठका झालेल्या असल्या तरी त्यापैकी सुमारे 11 बैठका कोरमअभावी तहकूब कराव्या लागल्या आहेत. मासिक बैठका तहकूब करण्याचा पायंडाच ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केला आहे. मासिक बैठक तहकूब करुन कोरम अभावी घेण्यात येणार्‍या तहकूब बैठकीत मनासारखे विषय मंजूर करून घेण्याची प्रथा रुढ होत असल्याने प्रत्यक्ष विकासासाठी ही गोष्ट मारक आहे. मासिक बैठकीचा अजेंडा 3 दिवस अगोदर देण्याचा नियम असला तरी अजेंडा 5 ते 7 दिवस आगोदर देऊनही सदस्य बैठकीला दांडी मारीत आहेत.

बैठकीसाठी सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्य दीपक पवार, सुनिल त्रिभुवन, अशोक कचे, सदस्य पती जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव उपस्थित होते.

15 ऑगस्ट राष्ट्रीय सणाचे नियोजन करण्यासाठी काल मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी पंच प्राण शपथ घेण्यात आली. यावेळी काही सदस्य या शपथ समारंभाच्यावेळी उपस्थित होते. मात्र ते बैठकीस आले नाहीत. या बैठकीस 12 सदस्य आलेच नाही. त्यामुळे कोरमअभावी बैठक तहकूब करावी लागली. आम्ही प्रत्येक बैठकिला वेळेपूर्वी हजर असतो मात्र काही सदस्य जाणूनबुजून गैरहजर राहत आहेत. नागरिकांच्या समस्यांवर मासिक बैठकीतच चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या