Thursday, March 13, 2025
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायतीत 50 ते 60 लाखांचा गैरव्यवहार

टाकळीभान ग्रामपंचायतीत 50 ते 60 लाखांचा गैरव्यवहार

सदस्या कविता रणनवरे व छाया रणनवरे यांचा आरोप || केले नाही तर चौकशीला का घाबरता?

टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत मार्फत होणारी शासकीय कामे शासनाच्या निकषाप्रमाणे होत आहेत, असा विश्वास जर सरपंच अर्चना रणनवरे यांना असेल तर त्यांनी चौकशीला छातीठोकपणे सामोरे जावे, चौकशीची भीती असण्याचे काही कारण नाही. या चौकशीच्या निमित्ताने गावातील जनतेसमोर ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असा पलटवार ग्रामपंचायत सदस्या कविता रणनवरे व छाया रणनवरे यांनी केला आहे.

- Advertisement -

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कविता रणनवरे व छाया रणनवरे यांनी म्हटले आहे की, चौकशीच होऊ नये असा अट्टाहास नेमका कशासाठी? याचा अर्थ ‘दाल में कुछ काला है’. सरपंच या चौकशीला घाबरल्या असल्यानेच आणि केलेला गैरव्यवहार लपवण्यासाठी त्यांनी सदस्यांची दिशाभूल करून सह्या गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. विद्यमान सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने चौदावा वित्त आयोग, पंधरावा वित्त आयोग, दलित वस्ती योजना व ग्रामनिधीत मोठा गैरव्यवहार केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पंधराव्या वित्त आयोगातून म्हैसमाळे यांचे घर ते बाळासाहेब शिंदे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक न टाकता पावणेचार लाखांची रक्कम काढून घेतली आहे.

पोलीस स्टेशन जवळील बंदिस्त गटारीचे सुमारे दोन लाखांचे काम झालेले नसताना बिले काढली आहेत. तसेच गावात दिवाबत्ती व दलित वस्तीत दिवाबत्ती करण्याच्या नावाखाली जवळपास 20 लाखांची रक्कम लाटली आहे. प्रत्यक्षात असे कुठलेही काम झालेले दिसत नाहीत व त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तेच पुरावे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे सादर केलेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी सुमारे सात लाख रुपयांचे बिल काढण्यात आलेले आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी फक्त एक प्लास्टिकची पाण्याची टाकी बसवण्यात आलेली आहे. मातंगवाडा चौक सुशोभीकरणासाठी सहा लाखांच्या आसपास बिल काढून प्रत्यक्षात किरकोळ काम करण्यात आलेले आहे.

गावकर्‍यांनी देखील सदर कामे झालेली आहेत की नाही याची प्रत्यक्षस्थळी भेट देऊन खात्री करावी, अशी आमची गावकर्‍यांना विनंती आहे. अतिक्रमणाबाबत तर गेल्या तीन महिन्यांपूर्वी जुन्या ग्रामपंचायत इमारती जवळ जागा धरण्याच्या वादातून कोणी कोणाचे कपडे फाडले, हाणामार्‍या केल्या आणि एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या. हे ग्रामस्थांना माहीत आहे. आणि तेच लोक आज एकत्र बसून आम्ही अतिक्रमणाला प्रोत्साहन देत असल्याचे खोटे आरोप आमच्यावर करत आहेत. गेल्या चार वर्षाच्या आपल्या कार्यकाळात सरपंच यांनी मुरकुटे-ससाणे युतीच्या सदस्यांना व नेते मंडळींना अंधारात ठेवून विरोधकांना जवळ करूनच कारभार केलेला आहे. त्यामुळे त्यांचा आणि मुरकुटे गटाचा कुठल्याही प्रकारचा संबंध आता राहिलेला नाही आणि त्यांना या युतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार देखील नाही, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर कविता रणनवरे, छाया रणनवरे व मल्हार रणनवरे यांची नावे आहेत.

सरपंच अर्चना रणनवरे यांनी स्वतः केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊ नये म्हणून दिलेल्या निवेदनावर माझी सही असल्याचे मी, वर्तमान पत्रातून वाचले. त्यांनी गैरसमजूत करुन त्या निवेदनावर माझी सही घेतलेली आहे. एकत्र कामकाज करीत असल्याने विश्वास ठेवून सही केलेली आहे. मात्र, सरपंच रणनवरे यांनी माझ्या नावाचा व सहीचा गैरवापर केलेला आहे.
– सुनील त्रिभुवन (ग्रा.पं सदस्य.)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...