Monday, November 25, 2024
Homeनगरटाकळीभानच्या गावपुढार्‍यांना विकास कामाची अ‍ॅलर्जी

टाकळीभानच्या गावपुढार्‍यांना विकास कामाची अ‍ॅलर्जी

अनेक योजना रखडल्याने नागरिकांची गैरसोय

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या व राजकीय प्रतिष्ठा असलेल्या टाकळीभान गावच्या गाव पुढार्‍यांना विकास कामांची अ‍ॅलर्जी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. निधी उपलब्ध असतानाही केवळ सत्ताधारी व विरोधकांतील गटबाजी व श्रेयवादामुळे अनेक विकासाच्या योजना पडून आहेत. तर काही योजनांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. गाव पुढार्‍यांच्या या नाठाळपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावावर तालुक्याच्या आमदार खासदारांची नेहमीच मेहेरनजर राहिल्याने विविध विकास कामांसाठी निधीही मिळत राहिलेला आहे. मात्र, गेल्या दोन तीन वर्षांत ग्रामपंचायतीत सत्तेत आलेल्या सदस्यांच्या बेबनावामुळे अनेक मोठमोठ्या विकास योजना रखडल्या आहेत.

- Advertisement -

पदाधिकारी, सदस्य व त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी जमीनदोस्त केलेल्या बस स्थानकासाठी आ.लहु कानडे यांचा निधी मिळवून ही गेल्या दोन वर्षांपासून बस स्थानकाचे काम रखडून पडले आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी आ.कानडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पहाणी करून संबधितांसोबत चर्चा करून जागेचा तिढा सुटल्याने दोन दिवसांत काम सुरू करण्याचे सांगितले होते. त्यानुसार दुसर्‍याच दिवशी बांधकाम ठेकेदाराला पाठवून जागेची आखणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ठेकेदार मोजमाप घेण्यासाठी आले असता जागेचा तिढा सुटला नसल्याचे संबंधितांनी सांगून ठेकेदारालाच पिटाळून लावले. बस स्थानक नसल्याने महाविद्यालयीन मुली व महिलांची रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत असल्याने मोठी कुचंबना होते. गाव पुढार्‍यांना महिलांच्या कुचंबनेचेही देणे घेणे नसल्याने हा प्रश्न दोन वर्षे रखडलेला आहे.

पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करत अद्ययावत वाचनालय व अभ्यासिकेसाठी 45 लाखांचा निधी आमदारकीची सुत्रे स्विकारताच उपलब्ध करुन दिला होता. परंतु गाव पुढार्‍यांच्या अंतर्गत लाथाळ्यात व श्रेयवादात हे विकास काम अद्याप रखडलेले आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत या योजनेसाठी सुमारे 2 कोटींचा निधी मंजूर झाला होता. योजनेबाबत ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने हा मोठा निधी अद्याप अडकून पडलेला आहे. याबाबत सुमारे 18 कोटींचा सुधारीत वाढीव प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले जात असले तरी एवढा मोठा निधी या योजनेसाठी मंजूर होणार की नाही? झाला तर कधी होईल? याबाबत निश्चिती नसल्याने 2 कोटींचे कामही सध्या रखडलेले आहे. शासनाच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी वर्षापूर्वी 72 लाखांचा निधी मंजूर आहे. वाजत गाजत कामाचा शुभारंभही झाला होता.

परंतु कोणत्या तरी कारणामुळे हे विकास कामही वर्षापासून रखडले आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी नागरिकांना मोफत शुध्द पाणी मिळावे यासाठी तीन वर्षापूर्वी आरो प्लान्ट जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत बसवून दिला आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या अंतर्गत कलहामुळे हा प्लांटही धूळखात पडून आहे. या सर्व रखडलेल्या योजना मंजूर असून वर्ष दोन वर्षांपासून ग्रामपंचायत व गाव पुढारी यांच्या उदासीन धोरणामुळे रखडून पडलेल्या आहेत. या योजना रखडल्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गाव पुढार्‍यांनाच विकासाची अ‍ॅलर्जी झाल्याचे आता बोलले जात आहे. ग्रामस्थांना किमान सुविधा पुरवण्यासाठी तरी ग्रामपंचायत प्रशासन व गाव पुढार्‍यांनी एकदिलाने विकास कामे पूर्ण करावीत अशीही मागणी आता होवू लागली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या