Saturday, May 4, 2024
Homeनगरटाकळीभानच्या ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा

टाकळीभानच्या ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथे सुमारे आठ वर्षे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीचा प्रश्न सध्या प्रतिष्ठेचा ठरू पहात आहे.

- Advertisement -

एक गट बदलीसाठी प्रयत्नशिल आहे. तर दुसरा गट बदली होऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. ग्रामपंचायतीत नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे ग्रामविकास अधिकार्‍यांची मात्र ओढाताण होत आहे.

टाकळीभान येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून आर. एफ. जाधव हे सुमारे आठ वर्षे कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीची सत्ता गेली 10 वर्षे माजी सभापती नानासाहेब पवार गटाच्या ताब्यात आहे. त्याकाळात ग्रामविकास आधिकारी जाधव यांचा कार्यकाळ सुरळीत पार पडला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकत ग्रामपंचायतीत सत्तांतर होवून पवार गट सत्तेतून पायउतार झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता नव्याने स्थापीत झाली आहे.

ग्रामविकास अधिकारी जाधव हे कामकाज करताना दुजाभाव करीत असल्याचा आरोप पवार गटाकडून केला जात असल्याने पवार गटाने जाधव यांची बदली व्हावी, अशी मागणी करत जाधव यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावली आहे. पंचायत समितीची सत्ता विखेपाटील गटाकडे असल्याने जाधव यांची बदली होणारच असा दावा पवार गटाकडून केला जात आहे.

तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडुन बदली होवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली. महाविकास आघाडीच्या गावपुढार्‍यांनीही हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. आ. लहु कानडे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचीही फोनवरून आभाळे यांच्याशी चर्चा झाली.

सत्तांतर होताच दोन्ही गटांनी ग्रामविकास आधिकारी जाधव यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे या बादली प्रकरणात कोणाची सरशी होणार हे थोड्याच दिवसात समजणार असले तरी सत्तांतराचा फटका मात्र ग्रामविकास आधिकारी जाधव यांना बसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या