Saturday, July 27, 2024
Homeनगरटाकळीभानच्या सरपंच उपसरपंचांनी राजीनामे द्यावेत

टाकळीभानच्या सरपंच उपसरपंचांनी राजीनामे द्यावेत

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभानच्या सरपंच व उपसरपंच यांनी आपले राजीनामे द्यावेत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनिल बोडखे, छाया रणनवरे, कविता रणनवरे यांनी केली आहे.

- Advertisement -

टाकळीभान ग्रामपंचायतची निवडणूक होऊन अडीच वर्षे उलटून गेले आहे. सत्ताधारी गटाच्या विरोधात 16-1 अशा फरकाने निवडणूक लोकसेवा महाविकास आघाडीने जिंकून इतिहास घडविला होता. उपसरपंच यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्यांच्या विरोधात आवाज उठू लागला. सत्ताधारी गटात फूट पडली.

पदाधिकारी निवडीत काही स्वयंघोषित नेत्यांनी सरपंचपदाचा 20-20-20 महिन्याचा फार्म्युला ठरवला तर उपसरपंच पदासाठी 1-1 वर्षाचा फार्म्यूला ठरल्याने एक वर्षात उपसरपंचपद स्वतः सोडण्याचा शब्द दिला होता. मात्र 31 महिन्याचा कालावधी उलटूनही सरपंच उपसरपंच यांनी राजीनामे दिले नसल्याने त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, नवीन पदाधिकार्‍यांची निवड करावी अशी, मागणी सरपंचपदाच्या दावेदार छाया रणनवरे, कविता रणनवरे व सुनील बोडखे यांनी केल्याने ग्रामपंचायतीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

या स्वयंघोषित पुढार्‍याने त्याने दिलेल्या शब्दालाच तिलांजली देऊन सत्तेच्या लोभापाई राजीनामा न देता बाकी लोकांना दोषी धरत आहे. सरपंच, उपसरपंचपदाची निवड होऊन 31 महिने उलटून गेले आहेत. तरी देखील सरपंच आणि उपसरपंच राजीनामा देत नाही. याची आम्हाला खंत आहे. उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्या शब्दाप्रमाणे सरपंच अर्चना रणनवरे आणि उपसरपंच कान्हा खंडागळे यांचा कालावधी संपला असून त्यांनी उर्वरित सदस्यांना संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे. उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी ग्रामपंचायत सभागृहात पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचे नाटक केले होते. परंतु आजतागायत त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

उपसरपंच आणि सरपंच यांनी राजीनामा देऊन नवीन सरपंच व उपसरपंच यांची निवड करून सर्वांना संधी द्यावी, अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. यासाठी लवकरच श्रेष्ठींची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही सदस्य सुनील बोडखे, कविता रणनवरे व छाया रणनवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सध्या विद्यमान उपसरपंचाची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झालेली असून त्यामुळे उपसरपंच आपल्या माजी सहकार्‍यांवर बेताल आरोप करत आहेत.

– सुनील बोडखे, सदस्य टाकळीभान

- Advertisment -

ताज्या बातम्या