Thursday, June 13, 2024
Homeनगरटाकळीभानचे तलाठी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

टाकळीभानचे तलाठी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानला मोठा शेतशिवार असल्याने गेली अनेक वर्षे येथे कामकाजासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय आहे. मंडलाधिकारी कार्यालयही येथेच असल्याने अद्ययावत इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून कामकाज प्रभारी तलाठ्याकडे आसल्याने मूळ सजा सांभाळून एक किंवा दोन दिवस तलाठी उपलब्ध होत आहे.त्यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची उतारे व दाखल्यांसाठी ससेहोलपट होत आहे. त्यामुळे स्वतंत्र तलाठ्याची नेमणूक व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान येथील तलाठी कार्यालयात गेल्या एक वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे गावातील शेतकरी व शालेय विद्यार्थ्याचे रहिवासी, उत्पन्नाचे व इतर शासकीय दाखल्यांसाठी मोठी परवड होत आहे. सध्या कार्यालयात प्रभारी तलाठी असून गेल्या पंधरा दिवसांपासून कार्यालयात येत नाही. त्यामुळे कार्यालय बंद आहे.

शेतकर्‍यांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शासकीय कामासाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने टाकळीभान तलाठी कार्यालयात कायमस्वरूपी तलाठी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कायमस्वरूपी तलाठी यांची नेमणूक करण्यात न केल्यास टाकळीभान येथे श्रीरामपूर नेवासा रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

टाकळीभान गावचा सुमारे 7 हजार एकराचा मोठा शेतशिवार आहे. गावच्या लोकसंख्येनेही 25 हजारी पार केलेली आहे. त्यामुळे महसूल विभागाला मोठा महसूल मिळत असल्याने प्रशस्त तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयाची अद्ययावत वास्तू शासकीय निधीतून उभारलेली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून अनेकदा कार्यालयाला कुलूप लावलेले असल्याने शेतशिवार व शालेय विद्यार्थ्यांचे उतारे व दाखल्यासाठी कुचंबना होत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी नागरिकांची व विद्यार्थ्यांची होणारी कुचंबना थांबवण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या