टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
टाकळीभान परिसराला वरदान ठरलेला टाकळीभान टेलटँक पावसाळा संपत आला तरी अद्याप तहानलेलाच आहे. भंडारदरा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस असल्याने भंडारदरा व निळवंडे दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून टाकळीभान टेलटँक पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
माजी मंत्री दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नातून 1972 च्या भयावह दुष्काळी परीस्थितीत नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी येथील माळरानावर टाकळीभान टेलटँकची मुहूर्तमेढ रोवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सलग पाच ते सहा वर्षांच्या बांधकामानंतर टेलटँक पाणी आडवण्यासाठी तयार झाला होता. या टेलटँकची निर्मितीच मूळ पावसाच्या पाण्यावर नसून भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर झालेली आहे. 98 दलघफू क्षमतेचा हा टेलटँक 1979 पासून दरवर्षी भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून भरला जात आहे. या टेलटँकला कालवा असल्याने टाकळीभानचा काही भाग व नेवासा तालुक्यातील घोगरगावची संपूर्ण सुमारे 3 हजार एकरापेक्षा जास्त शेती ओलिताखाली आलेली आहे. तर परिसरातील 8 ते 10 गावांचा पाण्याचा पाझर वाढल्याने परीसर सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. त्यामुळेच हा टेलटँक परिसराला वरदान ठरलेला आहे.
टेलटँकच्या जन्मानंतर एक ते दोन वर्षांचा अपवाद वगळला तर अॅागस्ट महिन्यापर्यंत टेलटँक पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. गेल्या तीन वर्षात तर जुलै महिन्यातच टेलटँक पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहिलेला आहे. मात्र यंदा सप्टेंबर महिना संपत आला तरी टेलटँक अजून तहानलेलाच आहे. आज रोजी टेलटँकमध्ये 50 ते 55 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. शेती सिंचनाशिवाय या परीसरात परीसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील गावांचा काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. सध्या भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे ओसंडून वाहू लागल्याने ओव्हरफ्लोचे पाणी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे या ओव्हरफ्लोचे पाणी प्रवरा डाव्या कालव्यातून टाकळीभान टेलटँकमध्ये सोडून टाकळीभान टेलटँक पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा, अशी आग्रही मागणी जलसंपदा विभागाकडे होत आहे. अन्यथा येणार्या काही दिवसांत शेतीसह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.