टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
तपासणीची फी मागितल्याच्या कारणावरून डॉक्टर दाम्पत्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली. या घटनेमुळे टाकळीमिया येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून या घटनेच्या निषेधार्थ काल गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जोपर्यंत डॉ.विटनोर यांच्यावर दाखल केलेला अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा मागे घेत नाही, तोपर्यंत गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
याबाबत डॉ.प्राची विटनोर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे त्यांचे विटनोर मल्टीस्पेशालिटी व दातांचा दवाखाना असून शेजारी त्यांच्या दिराचे रक्त, लघवी तपासणी लॅबोरेटरी आहे. शुक्रवार, दि. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या दवाखान्यात संजय सगळगिळे याने येऊन सांगीतले की, माझ्या पत्नीचा दात दुखत असून तिला दवाखान्यात 10 मिनीटात घेऊन येतो, असे सांगून निघून गेला. त्यानंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी प्रियंका सगळगिळे दवाखान्यात आल्यानंतर त्यांना तपासून औषधे लिहून देत सोमवारी पुन्हा तपासणीसाठी येण्यास सांगितले व 150 रुपये तपासणी फी मागितली. तेव्हा पियंका सगळगिळे म्हणाल्या की, माझे पती गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गेले आहे.
ते आल्यावर पैसे देतील. त्यानंतर डॉ. अनिल विटनोर यांनी संजय सगळगिळे यांना फोन करून सांगितले की, तुमच्या पत्नीला तपासून औषधे लिहून दिली आहे. तपासणीची फी सोमवारी द्या, आमची लहान मुलगी घरी आहे. आम्हाला घरी जाण्यास उशिर झाला आहे. त्यानंतर संजय याने दोनच मिनिटात आलो, असे म्हणून जवळपास आर्धा तास आलाच नाही. त्यामुळे आम्ही आमचा दवाखाना बंद करून खाली आलो असता संजय सगळगिळे, केतन सगळगिळे, प्रियंका सगळगिळे, चंद्रकांत सगळगिळे (सर्व रा. टाकळीमिया) यांनी आमच्या दवाखान्याचे शटर उघडून आत जाऊन सामानाची तोडफोड करण्यास सुरूवात केली. आम्ही त्यांना थांबविण्यास गेलो असता त्यांनी आम्हास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तुम्ही आमच्या नादी लागला तर अॅट्रोसिटीचे खोटे गुन्हे दाखल करून नेहमीच त्रास देऊ व टाकळीमिया गावात दवाखाना कसे चालविता ते पाहू, असे म्हणून निघून गेले.
डॉ. प्राची विटनोर यांच्या फिर्यादीवरून संजय सगळगिळे, केतन सगळगिळे, प्रियंका सगळगिळे, चंद्रकांत सगळगिळे (सर्व रा. टाकळीमिया) यांच्या विरोधात गु.र.न. 996/2023 भा.दं.वि 452, 427, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती गावात समजताच काल, 2 सप्टेंबर रोजी गावातील सर्व ग्रामस्थ व व्यावसायिकांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त करून कडकडीत बंद पाळला. व राहुरी पोलीस ठाण्यात येऊन प्रशासनाला निवेदन दिले.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, टाकळीमिया येथे डॉ. अनिल विटनोर यांच्या दवाखान्यात काही समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. व राहुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांनी परिस्थितीची माहिती घेतली असता यामध्ये डॉ. विटनोर यांची चूक नसताना काही समाजकंटक फक्त गावात दहशत निर्माण करीत नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असतात. जोपर्यंत या समाजकंटकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व व्यावसायिक व ग्रामस्थांनी गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, सुरेशराव निमसे, ज्ञानदेव निमसे, शिवशंकर करपे, बाळासाहेब जाधव, पिंटूनाना साळवे, योगेश करपे, सुभाष जुंदरे, रमेश सोनवणे, अॅड. राहुल, यशवंत सेनेचे विजय तमनर, विक्रम गाडे, राजेंद्र गायकवाड, उपसरपंच किशोर मोरे, वैभव पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश भानुदास करपे, सचिन करपे, डॉ.सचिन चौधरी, भागवत नवाळे, गोरख शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉक्टरवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
उशिरा आलेल्या महिला रुग्णाला अपशब्द वापरून जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील डॉ. अनिल विटनोर यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांका संजय सगळगिळे 39 या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 1 सप्टेंबर रोजी त्यांची दाढ दुखत असल्याने त्या सायंकाळी 7.30 ला आपले पती संजय यांच्याबरोबर टाकळीमिया येथील डॉ. अनिल विटनोर यांच्या दवाखान्यात गेल्या होत्या. त्यांना दवाखान्यात सोडून पती रिक्षात पेट्रोल टाकायला गेले. तेव्हा डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी दाढ दुखत असल्याचे सांगितले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, किती वेळापासून वाट पाहत आहे, एवढा उशिर का झाला, तपासणी फी लवकर द्या.
तेव्हा सगळगिळे यांनी त्यांचे पती पेट्रोल भरायला गेले, आल्यावर लगेच देते, असे सांगितले. तेव्हा डॉक्टर तुम्हाला वेळेचे भान नाही.असे म्हणून काही अपशब्द वापरले. त्यावर डॉक्टर तुम्ही निट बोला, असे म्हटल्यावर तुमच्या बरोबर काय व्यवस्थित बोलायचे, असे म्हणत डॉक्टरांनी जातीवाचक शिवीगाळ केली. सगळगिळे यांनी लगेच पतीला बोलवले असता पतीलाही त्यांनी जातीवरून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. प्रियंका सगळगिळे यांच्या फिर्यादीवरून डॉ. अनिल विटनोर यांच्याविरोधात गु.र.न. 995/2023 नुसार भादंवि कलम 504, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1) (आर), 3(1) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.