Saturday, September 14, 2024
Homeनगरटाकळीमियाच्या ग्रामसभेत जागेवरूनच गोंधळात गोंधळ

टाकळीमियाच्या ग्रामसभेत जागेवरूनच गोंधळात गोंधळ

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे चार दिवसांपूर्वी बोलाविलेली ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर काल गुरुवार दि. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सुरवातीला गोंधळ होऊन नंतर सर्व विषयांवर चर्चा होऊन शांततेत पार पडली.

टाकळीमिया ग्रामपंचायतीने येथील महादेव मंदिरासमोर सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सरपंच विश्वनाथ निकम होते. परंतु गुलाब निमसे व प्रताप जाधव यांनी बाजारतळाच्या प्रांगणात सभेचे आयोजन केले व लाऊडस्पीकर लावून सभा येथे होईल, असे सांगितले. नंतर त्यांनी या सभेत येऊन सभेच्या जागेवरून तसेच आता होत असलेल्या सभेत गावात असलेले शासकीय कर्मचारी व पंचायत समितीचे सभेचे निरीक्षक का हजर नाहीत? तसेच कोरम पूर्ण नाही, यावरून गोंधळ सुरू झाला. सभेच्या जागेवरून वाद होण्याचे टाळण्यासाठी सभा कुठे घ्यावी? याबाबत नंदू जुंदरे यांनी काही पर्याय सुचविले. त्यावर गैरहजर राहणार्‍या प्रतिनिधींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव करा, अशी सूचना रवींद्र मोरे यांनी केली. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.

ग्रामविकास अधिकारी बी. जी. निमसे यांनी मागील सभेचे प्रोसेडिंगचे वाचन केले व सभेपुढील विषय सादर केले. शिवशंकर करपे म्हणाले, नळ योजनेच्या पाण्याचा प्रश्न कायम उपस्थित होतो. त्यासाठी व या योजनेच्या थकीत वीजबिलावरून कायम वीजपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. त्यासाठी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे हे प्रश्न आपण मांडले का? त्यांच्याकडे प्रस्ताव का दिला नाही? असा सवाल उपस्थित केला.

शेतकर्‍यांसाठी शासकीय योजनांची माहिती देऊन नवीन शेती औजारे व फळबाग लागवडीसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक शिवप्रसाद कोहकडे यांनी केले. अंगणवाडी शाळेत विजेची व्यवस्था नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच नवीन वीज कनेक्शन देऊ, असे रवींद्र मोरे यांनी सांगितले. अ‍ॅड. रावसाहेब करपे यांनी दलित वस्तीतील रस्त्याची समस्या मांडली. अनेक अर्ज देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी यांच्या निवासाचा सुमारे 12 कोटींचा मंजूर निधी जिल्हा परिषेकडे पडून आहे. ते काम का होत नाही? अशी सुधाकर शिंदे यांनी विचारणा केली. यावर नियोजित निवासस्थानाच्या जागेबाबत कोर्ट केस चालू आहे. ग्रामपंचायत हद्दीत मोकळी जागा उपलब्ध झाल्यास ते काम पूर्ण केले जाईल, असे रवींद्र मोरे यांनी सांगितले. निवडून दिलेले सदस्य मासिक मिटींगमध्ये उपस्थित रहात नाहीत. त्यासाठी सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रताप जाधव यांनी केली. त्यावर एक महिन्यात हे काम होईल, असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले.

घरकुल, पाणी, आरोग्य केंद्र, रस्ते, स्ट्रीट लाईट अशा समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. गावात होणार्‍या कामाच्या टेंडरवर चर्चा करण्यात आली. शासकीय योजना व कामांची माहिती देऊन व सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे ग्रामविकास अधिकारी बी. जी. निमसे यांनी जाहीर केले.

यावेळी उपसरपंच किशोर मोरे, रवींद्र मोरे, सुभाष जुंदरे, शिवशंकर करपे, सुभाष करपे, संजय विधाटे, सुनील शिंदे, राजेंद्र गायकवाड, ज्ञानदेव निमसे, साहेबराव निमसे, बाळासाहेब जाधव, राजेंद्र करपे, नंदू जुंदरे, अरुण शिंदे, पो. पाटील नामदेव जगधने, शिवप्रसाद कोहकडे, आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या