Tuesday, July 7, 2026
HomeनगरAhilyanagar : टाकळीमियाँत संशयास्पद डेअरी पावडरचा साठा उघड

Ahilyanagar : टाकळीमियाँत संशयास्पद डेअरी पावडरचा साठा उघड

लाखांचा मुद्देमाल सीलबंद || परवाना नाही, खरेदी-विक्रीची बिलेही गायब

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारात शनिवारी (4 जुलै) मध्यरात्री पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहिल्यानगर व नाशिक पथकाने संयुक्त धाड टाकत सुमारे एक लाख रूपये किमतीच्या 25 गोण्या संशयास्पद डेअरी पावडरचा साठा जप्त करून सीलबंद केला. संबंधित व्यक्तीकडे साठवणुकीचा परवाना नसल्याचे तसेच पावडरच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कोणतीही बिले अथवा कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत उघडकीस आलेल्या डेअरी पावडर प्रकरणाचा तपास करताना त्याची धागेदोरे राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारापर्यंत पोहोचले. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एफडीएच्या अधिकार्‍यांसह घोरपडे नामक शेतकर्‍याच्या घरावर छापा टाकला. तेथे 25 गोण्या डेअरी पावडर आढळून आल्या. मात्र, त्या साठवण्याचा परवाना किंवा खरेदी-विक्रीची अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत.

यामुळे पथकाने सविस्तर पंचनामा करून संपूर्ण साठा जागेवरच सीलबंद केला. तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी पावडरचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍याने सांगितले. मात्र, या कारवाईनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संशयास्पद साठा मिळूनही संबंधित शेतकर्‍याला ताब्यात का घेण्यात आले नाही? पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये कारवाई केली म्हणजे त्यांच्या हद्दीत गुन्हा दाखल झाला होता का? जर गुन्हा दाखल असेल, तर आरोपीविरोधात तत्काळ कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नसल्याने कारवाईबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

दूध संकलन केंद्रावरही छापा
याच पथकाने टाकळीमियाँ शिवारातील जयहरी दूध संकलन केंद्रावर देखील धाड टाकली. या केंद्रावर दररोज सुमारे एक हजार लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती समोर आली. येथील दूधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

एफडीएच्या कारभारावरही प्रश्न
या संपूर्ण कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक पथकातील अधिकारी उपस्थित होते. मात्र, अहिल्यानगर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कारवाईपासून दूर राहिल्याची चर्चा आहे. त्यांच्या अनुपस्थितीत कनिष्ठ अधिकार्‍यांवर रात्रीच्या वेळी कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांची मोठी धावपळ झाली. यामुळे एफडीएच्या अहिल्यानगर कार्यालयातील समन्वय आणि प्रशासकीय कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगरमध्येही छापेमारी रात्री उशिरापर्यंत कारवाई
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या सावेडी उपनगरातील के. के. एंटरप्राइजेसवर येथील अन्न व औषध प्रशासनाने रविवारी (5 जुलै) रात्री छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईतून मिळालेल्या माहितीनुसार के. के. एंटरप्राइजेस येथे छापा टाकण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. पुण्यातील मंचर येथे एक हजार लिटर दुधात 500 लिटर केमिकलच्या साहाय्याने तयार केलेले दूध मिसळत असल्याची बाब उघड झाली आहे. भेसळ करताना दुधात शाम्पू आणि दूध पावडरचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे नगरमध्ये कारवाई केली असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा, मुळा पाणलोटात पुनर्वसु सरींचे तांडव

0
भंडारदरा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर वाकी ओव्हरफ्लो, निळवंडेत आवक वाढली भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुर्नवसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने...