Saturday, May 4, 2024
Homeनाशिकउद्यानात वावरणाऱ्या 'त्या' गुंडांचा बंदोबस्त करा !

उद्यानात वावरणाऱ्या ‘त्या’ गुंडांचा बंदोबस्त करा !

नवीन नाशिक | Nashik

सावतानगर परिसरात असलेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यानात काही टवाळखोरांनी हैदोस घातला असून या प्रकाराकडे अंबड पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.

- Advertisement -

यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या टवाळखोरांचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच उद्यान परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी आणि येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली असून याबाबतचे मागण्यांचे निवेदन शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिले .

करोना नंतरच्या लॉकडाउनच्या काळात उद्यान बंद असल्यामुळे अनोळखी गुंड तसेच टवाळखोर व्यक्तींचा उद्यानात वावर वाढला आहे.

मद्यसेवन करण्याबरोबर विविध बेकायदेशीर बाबींना त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याने उद्यान परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टवाळखोरांमध्ये काही किशोरवयीन मुलींचाही समावेश आहे. त्यांना हटकण्याचा आणि समज देण्याचा नागरिकांनी अनेकदा प्रयत्न केला.

परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. उलट त्यांच्याकडून धमकावले जाते. या साऱ्या गोष्टींमुळे या परिसरात राहणे धोक्याचे झाले असून वेळीच या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा त्वरित बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तसेच उद्यानाच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवावी जेणेकरून या गुंडांना उद्यानात प्रवेश करणे शक्य होणार नाही.

या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी जेणेकरून गुंडांना जरब बसेल. परिसरात व उद्यानात पथदीपांची संख्या वाढवावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी सुभाष पगार, माधव नवले, शिवाजी दौंड, के.आर. थोरकर, भगतसिंग साळुंके आदीं उपस्थित होते.

या प्रकरणात त्वरीत लक्ष घालून आवश्यक ती कामे केली जातील. उद्यानात कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही याची आपण काळजी घेऊ. उद्यान परिसरात शांततेला बाधा निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल. –

सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या