Friday, May 24, 2024
Homeनाशिकसाथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करा

साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात करोना( corona ) प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी डेंग्यू, मलेरिया ( Dengue, malaria )आदी साथींचे आजार (communicable diseases ) बळावले असल्याने साथरोग नियंत्रणासाठी स्वच्छता विभागाने व्यापक उपाययोजना हाती घेत त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. स्वच्छता व जंतूनाशक फवारणी मोहिमेची पाहणी प्रत्येक प्रभागात नगरसेवकांसह आपण स्वत: करणार असून स्वच्छतेत दिरंगाई आढळून आल्यास संबंधित सेवकांवर कारवाईचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्ला ( Standing Committee Chairman Zafar Ahmed Ahmadullah ) यांनी दिला.

- Advertisement -

मनपात आयुक्त सभागृहात शहरात डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजार बळावत असल्याने स्थायी समिती सभापती जफर अहमद यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकारी व निरीक्षकांची बैठक घेत स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांतर्फे बैठकीत करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत सभापतींनी प्रभागात समक्ष भेट देत स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणीची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, सभागृह गटनेते असलम अन्सारी, विठ्ठल बर्वे आदी नगरसेवकांसह स्वच्छता विभागाचे अधिकारी, निरीक्षक यावेळी उपस्थित होते.

रिमझिम पावसामुळे शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदी साथींच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी बाधीत रूग्णांमुळे रूग्णालये तुडूंब भरली आहेत. त्यामुळे जंतूनाशक फवारणीची व्यापकता वाढवावी. अनेक प्रभागात जंतूनाशक फवारणीस विलंब होत असल्याची तक्रार असलम अन्सारी यांच्यासह नगरसेवकांनी बैठकीत केली.

स्वच्छता विभागात साधन सामुग्रीचा अभाव तसेच सेवकांची संख्या कमी असली तरी अधिकार्‍यांनी योग्य नियोजन करत साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच जंतूनाशक औषधे खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया तात्काळ राबवावी, अशी सुचना करत सभापती जफर अहमद यांनी स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणीच्या कामाची पाहणी आपण स्वत: नगरसेवकांसह प्रभागांना भेटी देवून करणार आहोत. करोना पाठोपाठ साथरोगांमुळे नागरीक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. याची जाणीव प्रत्येक सेवकाने ठेवली पाहिजे. कामात दिरंगाई आढळून आल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सभापती जफर अहमद यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिला.

स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांनी शहरात साथरोग नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. फवारणीसाठी औषध खरेदीचे टेंडर काढण्यात आले असून सात दिवसात ही प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. सर्व प्रभागात जंतूनाशक फवारणी व्हावी या दृष्टीकोनातून नियोजन केले जात आहे. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या प्रभागात न आल्यास याची तक्रार त्याच दिवशी निरीक्षकांनी करावी.

तसेच जंतूनाशक फवारणीची माहिती दररोज प्रभागातील नगरसेवकांसह अधिकार्‍यांना देण्याचे निर्देश पारखे यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिले. स्वच्छतेसह जंतूनाशक फवारणीच्या कामात कुचराई करणार्‍या सेवकांविरूध्द कारवाई केली जाणार असल्याचे पारखे यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल जफर अहमद यांचा स्वच्छता विभागातर्फे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी स्वच्छता विभागाचे मनीष ठाकरे, संदीप कापडे, सागर शेजवळ, गोकुळ बिराडे, ईसा बेग आदी अधिकारी, निरीक्षक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या