Wednesday, May 6, 2026
Homeनगरटाकळीभान-नेवासा मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात; धडक देऊन दुचाकीस्वार पसार, एकजण गंभीर जखमी

टाकळीभान-नेवासा मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात; धडक देऊन दुचाकीस्वार पसार, एकजण गंभीर जखमी

टाकळीभान (प्रतिनिधी)

रस्त्यावरील बेफाम वेगाचा आणि माणुसकी हरवलेल्या वृत्तीचा प्रत्यय देणारी एक घटना टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावर घडली आहे. लोखंडी फाॕल परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून, या अपघातात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संतापजनक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर मदतीऐवजी धडक देणारा चालक घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रामनाथ तुकाराम माळवदे आणि राजेंद्र बाळासाहेब गायकवाड हे दोघे बेलपिंपळगाव येथील शेतातील काम आटोपून आपल्या दुचाकीने (एम.एच.१७- ९५४५) घराकडे परतत होते. पिंपळगाव शिवारातील लोखंडी फाॕलजवळ समोरून येणाऱ्या गुलाब पठाण यांच्या बजाज प्लॅटिना दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर पाठीमागे बसलेले रामनाथ माळवदे यांच्या उजव्या पायाचे हाड अक्षरशः मोडले असून गंभीर इजा झाली आहे.

अपघातानंतर रक्तबंबाळ अवस्थेत माळवदे यांना नेवासा येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र अतिरक्तस्राव आणि प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुणे (तळेगाव दाभाडे) येथील अथर्व ॲक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमीला सोडून पसार होणाऱ्या चालकाविरोधात माळवदे कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त केला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप पोलीस तक्रार दाखल झालेली नसली तरी पसार चालकाचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या