Monday, July 27, 2026
Homeक्राईमBribery News : तलाठ्यासह दोन खासगी इसमांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

Bribery News : तलाठ्यासह दोन खासगी इसमांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यासह दोन खासगी इसमांना संगमनेरात 13 हजार रुपयांपैकी 6 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी (दि.17) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक व अहिल्यानगरच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोर्‍हाडे (वय 57) हा आश्वी बुद्रुक येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्यासोबत लाचेची रक्कम स्वीकारण्यात मदत करणारे हितेश सोमनाथ घोडेकर (वय 28, रा. राजापूर रस्ता, ढोलेवाडी, संगमनेर) आणि प्रतीक विजयकुमार कातोरे (वय 26, रा. सांगवी, ता. संगमनेर) या दोन खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रतीक कातोरे हा तलाठी बोर्‍हाडे यांचा भाचा आहे. यातील तक्रारदार हे शिक्षण घेत असून त्यांना स्वतःचा कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र काढायचे होते. त्यासाठी तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयात आपली मोठी ओळख असल्याचे सांगून तलाठी बोर्‍हाडे याने तक्रारदाराकडून यापूर्वीच 13 हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या मोठ्या बहिणीच्या दाखल्यासाठी पुन्हा 13 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

यामध्ये जातीच्या दाखल्यासाठी 6 हजार आणि जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 7 हजार असे एकूण 13 हजार रुपये लाचेचे स्वरूप होते. वारंवार होणार्‍या या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यावरुन नाशिक व अहिल्यानगरच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. तलाठी बोर्‍हाडे याने बहिणीच्या दाखल्यासाठी पहिल्या टप्प्यात 6 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार संगमनेर शहर परिसरात सापळा रचला आणि तलाठी बोर्‍हाडे याच्या सांगण्यावरून हितेश घोडेकर याने तक्रारदाराकडून 6 हजार रुपये स्वीकारले आणि ही रक्कम त्याने तत्काळ प्रतीक कातोरे याच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने तिघांनाही जागीच ताब्यात घेतले. रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोकॉ. रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक पोहेका. हारुण शेख यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे या करत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...