अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सातबारा उतार्यावर खरेदीची नोंद लावण्यासाठी हळगाव (ता. जामखेड) येथील तत्कालीन तलाठ्याने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 मे रोजी ही मागणी करण्यात आली होती. आता सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी मुजीब अब्दुलरब शेख (वय 51, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, रा. नवीपेठ, कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदाराच्या वडिलांनी हाळगाव येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नंबर 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केले होते. या खरेदी खताची नोंद सातबारा उतार्यावर लावण्याच्या मोबदल्यात तलाठी शेख याने तीन हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार 30 मे रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. त्यानुसार त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यात तलाठी शेख याने खरेदी खताची नोंद उतार्यावर लावण्याचा मोबदल्यात 10 हजारांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष शिंदे, चंद्रकांत काळे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.