अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाडळी आळे (ता. पारनेर) येथील तलाठी आशीर्वाद प्रभाकर घोरपडे (वय 34 रा. पाईपलाईन हाडको, एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर) याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (24 मार्च) केली. त्याच्याविरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारी (25 मार्च) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार (वय 35) यांच्या आत्याचे पती कळस (ता. पारनेर) येथे शेतजमिनीचे मालक होते. त्यांचा 6 ऑगस्ट 2023 रोजी मृत्यू झाला. वारस नोंद लावण्यासाठी तक्रारदार यांनी एक महिना आधी सर्व कागदपत्रे तलाठी घोरपडे यांच्याकडे जमा केली होती. मात्र, घोरपडे यांनी वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
पडताळणी दरम्यान, तलाठी घोरपडे यांनी तीन हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पथकाने पाडळी आळे तलाठी कार्यालयात सापळा रचला. लाच घेताना घोरपडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.