Saturday, May 4, 2024
Homeनगरतलाठी भेटत नसल्यामुळे पुणतांबेकर त्रस्त - चव्हाण

तलाठी भेटत नसल्यामुळे पुणतांबेकर त्रस्त – चव्हाण

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यात ग्रामीण भागात सर्वात मोठ्या असलेल्या पुणतांबा गावात कामगार तलाठी व मंडळ अधिकारी वेळेवर भेटत नाही. तलाठी कार्यालय सातत्याने बंद असते त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले असून यात राहाता तहसीलदार यांनी लक्ष घातले नाही तर पुणतांबा ग्रामस्थांच्यावतीने धडक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी दिला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी पुणताबा येथे न राहाता बाहेर गावाहून ये-जा करतात. ते कधी येतात, कधी जातात याची ग्रामस्थांना माहिती नसते. त्यांचे भ्रमणध्वनी नेहमीच संपर्क क्षेत्राबाहेर असतात तसेच त्यांच्या दौर्‍याची माहिती तलाठी कार्यालया बाहेर लावलेली नसते. त्यामुळे ग्रामस्थांना ते केंव्हा येणार ? कुठे आहेत? याची कल्पना नसते.

सोमवारी पुणतांबे गावाचा आठवडे बाजार असतो, त्यानिमिताने पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ कामानिमित पुणतांबा येथे येत असतात. सोमवारी अनेक ग्रामस्थ तलाठी कार्यालयात आले मात्र त्याला कुलूप असल्यामुळे अनेकजण दुपारपर्यंत पायर्‍या वर बसून होते. अखेर वाट पाहून कंटाळल्यामुळे निघून गेले. सर्वांनीच तलाठी कार्यालयाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पुणतांबा गाव राहाता तालुक्यात आहे मात्र मतदार संघ कोपरगाव आहे त्यामुळे गावाची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. अधिकारी वर्गगावर कोणाचा ही धाक नाही. पुणतांबा येथे पूर्णवेळ कामगार तलाठी द्यावा व त्याचे वास्तव पुणतांब्यात असावे, अन्यथा धडक आंदोलन करण्याचा इशारा श्री. चव्हाण यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या