तळेगाव दिघे । वार्ताहर
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता मद्यविक्री केंद्रांकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर रस्त्यावर असलेल्या ‘हॉटेल रुपेश बिअर बार’वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल २ लाख ३ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपानजीक सुरेश गंगाराम दिघे यांच्या मालकीचे ‘हॉटेल रुपेश बिअर बार व परमिट रूम’ आहे. गुरुवारी, ५ फेब्रुवारीच्या रात्री ते शुक्रवारी, ६ फेब्रुवारीच्या पहाटेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बारच्या खिडकीचे लोखंडी गज शिताफीने कापून आत प्रवेश मिळवला. चोरट्यांनी केवळ महागड्या दारूवरच हात साफ केला नाही, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही यंत्रणेचा ‘डिव्हीआर’ (DVR) देखील सोबत नेला.
चोरट्यांनी बारच्या काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि स्टोअर रूमचे कुलूप तोडून आतील साठा चोरला. यामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आणि सीपी कंपनीचा डिव्हीआर असा एकूण २ लाख ३ हजार ५५० रुपयांचा माल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी हॉटेल उघडल्यानंतर हा सर्व प्रकार मालक सुरेश दिघे यांच्या लक्षात आला, त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.
याप्रकरणी सुरेश गंगाराम दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तहेरांची मदत घेतली जात आहे. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानाची खिडकी तोडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.





