
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegaon Dighe
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे जलजीवन अंतर्गत नूतनीकरण काम सुरु असल्याने मागील दीड वर्षापासून बंद असल्याने लाभार्थी गावांमधील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहे. तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, तिगाव, काकडवाडी, पारेगाव, नान्नज दुमाला, देवकौठे, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द यांसह 16 गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याची संकल्पना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राबवली.
या योजनेवर कारभारासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची स्थानिक समिती बनवलेली आहे. त्या माध्यमातून अत्यंत माफक पाणीपट्टी घेऊन ही योजना अनेक वर्ष सुरू राहिली. योजनेस अडथळे आले, त्यावेळी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने योजना सुरू करण्यात आली. अनेक वर्ष लाभार्थी गावांमधील नागरिकांना योजनेद्वारे पिण्याचे पाणी मिळत होते. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या देवकौठे गावातील नागरिकांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची हमखास व्यवस्था या योजनेमुळे झाली होती.
मात्र, नूतनीकरण काम सुरु असल्याने मागील दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा प्रादेशिक योजना पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे लाभार्थी गावांना कोणताही पाणीपुरवठा होत नाही. साहजिकच नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. तथापि तळेगाव ग्रामपंचायतने गावासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाणी पुरवठ्याची सोय केली. योजनेंतर्गतच्या गावांमधील पाणीप्रश्नी माजी मंत्री थोरात यांची भेट घेऊन सदर योजना आपण सुरू केली आहे आणि पुन्हा आपण लक्ष घालून सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी काकडवाडीचे सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार, चिंचोली गुरवचे सरपंच विलास सोनवणे, विलास सोनवणे, योगेश सोनवणे, विजय गोडगे, वाल्मिक गोडगे, संदेश गोडगे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, दौलत गडाख, त्रंबक गडाख, डॉ. दत्तात्रेय गडाख, डॉ. संदीप गोर्डे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे.
पाईपलाईनला विरोध…
कोल्हेवाडी येथील स्थानिक पदाधिकार्यांनी या पाईपलाईनला अडचण निर्माण केली आहे. नवीन काम सुरू असताना तळेगाव योजनेला पाणी न देण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहे. कोणीही या कामात अडचणी आणू नका, अशी आग्रही मागणी तळेगाव भागातील नागरिकांनी केली आहे.




