अमेरिकेने (America) पहिली तालिबानी राजवट (Taliban regime) उलथून टाकल्यावर अफगाणी क्रीडाविश्वाने (Afghani Sports World) थोडा नि:श्वास सोडला होता. आत्मघाती हल्ले, बाँबस्फोट अशा भयग्रस्त वातावरणातही क्रिकेटसह इतर क्रीडाखेळांचे आयोजन सुरू राहिले. त्यामुळे अफगाणी क्रिकेट संघ असो अथवा इतर क्रीडापथके असोत, देश-विदेशात त्यांचा सहभाग सुरू राहिला. महिला क्रीडापटूंनाही संधी मिळाली. या कालावधीत अफगाणी क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर (Afghan athletes internationally) आपली ओळख निर्माण केली. पण आता क्रिकेटच नव्हे तर अफगाणिस्तानमधील एकूणच क्रीडाक्षेत्राच्या भवितव्या विषयी चिंता (Anxiety) निर्माण झाली आहे.
20 वर्षांपूर्वी जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट प्रथमच आली तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी देशातील फुटबॉल मैदानांचा वापर विरोधकांच्या शिरकाणासाठी केला होता. आता दुसर्यांदा अफगाणिस्तानात सत्तेवर आल्यावर तालिबानी दहशतवादी बंदुका घेऊन थेट अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयातच घुसले. तेव्हा अफगाणी क्रिकेट क्षेत्र हादरून गेले. क्रिकेट जगताला काळजी लागली आहे ती अफगाणी क्रिकेट आणि अफगाणिस्तानमधील एकूणच क्रीडाक्षेत्राच्या भवितव्या विषयी चिंता निर्माण झाली आहे.
तालिबान्यांनी सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम अफगाणी क्रिकेट मंडळाच्या प्रमुखाची उचलबांगडी करून आपला माणूस तेथे आणला. याचाच अर्थ तालिबानचे क्रिकेट विषयीचे धोरण थोडे सौम्य आहे असे दिसून येते. पण इतर सर्व खेळ आणि मनोरंजन करणार्या सर्व कलाप्रकारांवर बंदी घालण्याचे सध्यातरी त्यांचे धोरण आहे. अफगाणी महिला क्रिकेट संघावर तर त्यांनी बंदी घातलीच आहे; शिवाय महिलांचे हक्क पायदळी तुडवण्यास सुरुवात केली आहे. महिलांनी फक्त घरकाम पाहायचे आणि मुलांना जन्म द्यायचा, एवढेच काम करायचे असे एका तालिबानी नेत्याने म्हटल्याची बातमी मीडियावर झळकली होती.
अफगाणी महिला क्रिकेट संघावर बंदी घातल्यावर त्याचे पडसाद क्रिकेट विश्वात उमटत आहेत. महिला क्रिकेट संघावरील बंदी न उठवल्यास अफगाणी पुरुष संघाविरूद्धची आगामी मालिका आम्ही रद्द करू अशी भूमिका ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने घेतल्यानंतर तालिबाननेही तुमची तशी भूमिका असेल तर आम्हीही आमचा संघ पाठवणार नाही, अशी त्यांच्या स्वभावानुसार आडमुठी भूमिका घेतली आहे.
ऑक्टोबरमध्ये होणार्या टी-20 विश्व क्रिकेट स्पर्धेसाठी तालिबानच्या मुठीतील अफगाणी क्रिकेट मंडळाने आपला संघ जाहीर केल्यानंतर सध्या ब्रिटनमध्ये एका स्पर्धेत खेळत असलेला अफगाणी कर्णधार रशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला न बोलावता संघनिवड केली याचा अशाप्रकारे रशिद खानने निषेध केला आहे. त्याच्या जागी आता अष्टपैलू मोहम्मद नबीची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. पण हा संघ या क्रिकेट स्पर्धेत भाग घेईपर्यंत आणखी काय घडामोडी घडतील सांगता यायचे नाही. कारण महिला क्रिकेट संघावर तालिबानने बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) अ. क्रि. मंडळावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
खरं म्हणजे क्रिकेट आधी अफगाणिस्तानमध्ये फुटबॉलची थोडी क्रेझ होती. पण पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या अफगाणी निर्वासितांना क्रिकेटची गोडी लागली ती भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्यावेळी निर्माण झालेल्या वातावरणातून! विशेष म्हणजे या निर्वासितांमध्ये काही तालिबानी दहशतवादीही दडून बसले होते. त्यामुळेच कदाचित तालिबान्यांना क्रिकेटविषयी थोडी सहानुभूती आहे. त्यामुळेच क्रिकेटने तेथे थोडी गती घेतली ती तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळातच!
अमेरिकेने पहिली तालिबानी राजवट उलथून टाकल्यावर अफगाणी क्रीडाविश्वाने थोडा नि:श्वास सोडला. आत्मघाती हल्ले, बाँबस्फोट अशा भयग्रस्त वातावरणातही क्रिकेटसह इतर क्रीडाखेळांचे आयोजन सुरू राहिले. त्यामुळे अफगाणी क्रिकेट संघ असो अथवा इतर क्रीडापथके असोत, देश-विदेशात त्यांचा सहभाग सुरू राहिला. महिला क्रीडापटूंनाही संधी मिळाली. या कालावधीत अफगाणी क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. अफगाणी क्रिकेटला आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाले ते 2017 मध्ये! अफगाणी क्रिकेटच्या प्रगतीस सर्वांत जास्त हातभार लावला तो भारतानेच. त्यामुळे अफगाणी संघाने पहिली कसोटी खेळली ती भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये!
अफगाणिस्तानमधील काबुल, जलालाबाद, कंधाहार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियमस आहेत. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटनंतर फुटबॉल लोकप्रिय आहे. 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये अफगाणी फुटबॉल संघाने भाग घेतला होता. खलिदा पोपल ही पहिल्या अफगाणी महिला फुटबॉल संघाची कर्णधार होती. पण तालिबान्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिने देश सोडला. आता ती डेन्मार्कमध्ये निर्वासित म्हणून जगत आहे. तालिबानचे सत्तेवर पुनरागमन झाल्यावर अनेक क्रीडापटूंनी एकतर देश सोडला आहे किंवा ते देशाबाहेर जाण्याच्या बेतात आहेत.
ऑगस्टमध्ये तालिबान्यानी सत्ता हासिल केल्यानंतर अफगाणी नागरिकांची देशाबाहेर जाण्यासाठी काबुल विमानतळाबाहेर धांदल उडाली, त्यामध्ये अनेक खेळाडू आणि कलाकारही होते. यावेळी अमेरिकन विमानातून खाली पडून 19 वर्षीय अफगाणी फुटबॉलपटू झाकी अनवारी मरण पावला होता. तर विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात तीन क्रीडापटू ठार झाले होते. या दुर्घटनेने जग हळहळले होते. सर्वसामान्य अफगाणी नागरिकांनी तालिबानची किती धास्ती घेतली आहे ते यावरून दिसून येते.
अफगाणी क्रीडाखेळांवर अफगाणी स्पोर्टस फेडरेशनचे नियंत्रण आहे. पण आता तालिबान्यानी हे फेडरेशन बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानने 15 ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवात भाग घेतलेला आहे. 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रोबिना मुकिमयार आणि फीरबा राझायी या अफगाणिस्तानतर्फे सहभागी होणार्या पहिल्या अफगाणी महिला क्रीडापटू ठरल्या.
2008च्या बीजिंग ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवामध्ये अफगाणिस्तानचे चार क्रीडापटू सहभागी झाले होते. यामध्ये मेहबुबा अहमदयार ही महिला क्रीडापटू होती. तिला दहशतवाद्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या ऑलिम्पिकमध्ये रोहुल्लाह निकपाईने त्वायवोंदोमध्ये हे पहिलेवहिले पदक अफगाणिस्तानला मिळवून दिले.
त्यानंतर 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये याच निकपाईने पुन्हा तेकवोंदोमध्ये दुसरे कांस्यपदक मिळवले. एकूणच ऑलिम्पिकमध्ये अफगाणिस्तानला मिळालेली ही दोनच पदके आहेत. तालिबान्यांनी सत्तेवर पुन्हा आल्यावर तेकवोंदोपटू झाकिया खुदाबादीला टोक्यो पॅराऑलिम्पिक्समध्ये स्पर्धेत भाग घेण्यास मनाई केली. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कामिला युसुफी ही अफगाणी पथकाची ध्वजधारक होती. शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. आपली बहुदा ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असेल असे मत तिने मीडियासमोर बोलताना व्यक्त केले आहे.
2000 साली तालिबान्यांनी महिलांच्या ऑलिम्पिक सहभागावर बंदी घातल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अफगाणिस्तानच्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागावर बंदी घातली होती, पण तालिबानच्या पाडावानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अफगाणिस्थानवरील बंदी उठवली होती, ती आता पुन्हा लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.
क्रिकेट आणि फुटबॉल व्यतिरिक्त बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, बुद्धिबळ, मार्शल आर्ट्स असे इतर अनेक खेळ अफगाणिस्तानमध्ये खेळले जातात. अफगाणी बास्केटबॉल संघाने 2010 मध्ये द. आशियाई क्रीडास्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्याचप्रमाणे एशियन गेम्सचे ते विजेते ठरले होते. हमीद रहीमी हा तेथील लोकप्रिय बॉक्सर आहे.
2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बॉडीबिल्डर अहमद कादरीने ‘मिस्टर मसल’ हा किताब मिळवला होता. 2015 मध्ये अफगाणिस्तानमध्ये पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजण्यात आली होती. या स्पर्धेत 25 वर्षीय महिला धावपटू झैनाबने ही शर्यत पूर्ण करणारी पहिली अफगाणी महिला धावपटू हा बहुमान मिळवला होता. यावरुन असे दिसून येते की, सर्वसामान्य अफगाणी नागरिक हे क्रीडाप्रेमी आणि शांतताप्रिय आहेत, पण आता ते कट्टरतावादी तालिबानी दहशतवाद्यांचे गुलाम बनले आहेत.
पण सत्तेवर येताच तालिबानांनी दडपशाही, जुलूमशाही सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत बहरण्याच्या मार्गावर असलेले अफगाणी क्रीडाक्षेत्र पुन्हा अंध:कारात ढकलले जाण्याची शक्यता आहे.