Saturday, May 4, 2024
Homeनगरतालुका पातळीवरील संघर्षाचे पडसाद थेट गावात

तालुका पातळीवरील संघर्षाचे पडसाद थेट गावात

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी वर्षात जिल्हा बँक, बाजार समिती व सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

वास्तविक पाहता भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच या निवडणुकांसाठी मशागत केली. नव्या जुन्यांचा ताळमेळ घालत एकत्रिकरण केले. महाविकासआघाडीनेही कर्डिले यांच्या विरोधात दंड थोपटत मोठे आव्हान दिले आहे. जवळपास सर्वच गावांत दुरंगी लढती रंगणार आहेत. तालुका पातळीवरील राजकीय संघर्षाचे पडसाद आता थेट गावात दिसु लागले आहेत.

तालुक्यातील 59 गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण पेटले आहे. तालुक्यात भाजप नेते माजी आ. कर्डिले यांच्या गटाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकीची मोट आवळत महाविकास आघाडी मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे तालुका पातळीवर रंगणारे राजकीय युध्द थेट गावाच्या निवडणुकीत उतरू पाहत आहे.

तालुक्यात भाजपचे नेते कर्डिले यांच्या विरोधात विरोधकांनी एकत्रितपणे मोठे आव्हान दिले आहे. दोन्ही गटाकडून गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. कर्डिले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीबरोबरच आगामी सेवा संस्था, जिल्हा बँक, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गावोगावी दौरा करून नव्या जुन्यांचा मेळ घातला. दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला.

गावोगावचे दुखणे समजून घेत शांततेचा सल्ला दिला. सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, रेवन चोभे, दीपक कार्ले, रविंद्र कडुस यांच्या माध्यमातून निवडणुकांसाठी तालुक्यात साखर पेरणीचे काम सुरू आहे. तेही गावोगावच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करत आहेत.

दिवंगत नेते माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अनुपस्थित तालुका प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र आणण्यात जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पुढाकार घेत तीन पक्षांची एकत्रीत मोट बांधली. भाजप विरोधात कडवे आव्हान उभे करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग केला. आता आघाडीचे नेतृत्व शेळके यांच्या निधनामुळे गाडे यांच्याकडे आले आहे. काँग्रेसकडून प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के पक्षाची धुरा सांभाळत असले तरी त्यांना त्यांच्याच गावात वेळ द्यावा लागणार आहे.

युवकांना तिसर्‍या आघाडीची आस

निवडणुकीच्या तोंडावर गावोगावचे मैदान चांगलेच तापले आहे. परंतु, जुन्या प्रस्थापितांना बाजूला सारण्यासाठी तरुणाई तिसरी आघाडी करण्याच्या विचारात असून तिसरी आघाडी अस्तित्वात यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. आरपारचा नारा देत तिसरी आघाडी करायचीच, असे जाहीर आव्हानही दिले जात आहे. परंतु, या तिसर्‍या आघाडीला मिळणारी रसद कोणाची? त्यांना गावात कोण मदत करतेय? याकडे गावची नेते मंडळी लक्ष ठेवून आहे. तसेच तिसरी आघाडी मोडित कशी निघेल, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या