राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
गाडी थांबवून ठेवली म्हणून तिघांनी पाच जणांना मारहाण करून गाडीने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे शिवारात घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद चिंतामण उचाडे (वय 22) धंदा-मजुरी/शिक्षण रा. माळेवाडी, डुकरेवाडी तांभेरे रोड, सात्रळ ता. राहुरी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि 22 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास प्रसाद उचाडे तसेच त्याचे मित्र अमोल संभाजी सरोदे, शंकर मुरलीधर पवार, संदिप विजय वेताळ, शुभम विजय नालकर, केशव सुदाम माळी, ऋषिकेश दतात्रय सरोदे हे जीपमध्ये मातीच्या गोण्या भरुन घेवून जात असताना तांभेरे रोडलगत असणार्या पाटावर एक मुलगी ही निखिल गागरे रा. तांभेरे यांच्यासोबत बोलत होती, त्यावेळी त्यांनी गाडी थांबवली व ऋषिकेश दतात्रय सरोदे याने मुलीच्या वडीलांना फोन करून तुमची मुलगी निखिल गागरे यांच्याशी बोलत असलेबाबत सांगितले.
त्यानंतर काही वेळाने मुलीचे वडील व त्यांचे कुटुंबिय तेथे आले. त्याचवेळी निखिल गागरे यांचेही आईवडिल तेथे आले. दोघांचे आईवडिल हे एकमेकाशी बोलत असताना तेथे शुभम सांगळे, संकेत खेडेकर, अनिकेत खेडेकर सर्व रा. तांदुळनेर ता. राहुरी हे मोटारसायकलवरुन तेथे आले व ऋषिकेश सरोदे यास दमदाटी करुन म्हणाले की, तू निखिल गागरे याने आणलेली पल्सर मोटारसायकल का थांबवुन ठेवली? असे म्हणून तिघांनी त्यांना हातबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली.
मारहाणीत वरिल तिघापैकी कोणीतरी एकाने ऋषिकेश सरोदे यांच्या अंगठ्याला चावला, त्यामुळे त्याच्या बोटातून रक्त येवू लागल्याने ते त्याला घेवुन तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला निघाले असता त्यांच्या पाठीमागुन शुभम सांगळे, संकेत खेडेकर, अनिकेत खेडेकर हे त्याच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीतून प्रचंड वेगाने आले व पाठीमागे असलेल्या ऋषिकेश सरोदे, शंकर पवार व अमोल सरोदे बसलेल्या मोटारसायकलला त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे मोटारसायकवर मागे बसलेला शंकर पवार हा त्या चारचाकी गाडीच्या बोनटवर उडुन पडला व इतर दोघे रस्त्याच्या कडेला उडुन पडले. त्यानंतर प्रसाद आणि संदिप वेताळ बसलेल्या मोटारसायकलला त्यांनी पाठीमागुन धडक देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रसादने मोटारसायकल रस्त्याच्या खाली घातल्याने ते बचावले.
या घटनेतून सावरुन रस्त्यावर येवुन थांबले असता त्यांनी ही गाडी थोड्या अंतरावर जावुन फिरवुन पुन्हा त्यांच्या दिशेने आले व त्यांना सर्वांना गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सर्वानी त्यावेळी रस्त्याच्या खाली असलेल्या ओढयामध्ये उड्या मारल्याने आम्ही त्यातुन बचावले, त्यावेळी त्यांनी पाहिले की ती गाडी संकेत खेडेकर हा चालवित होता व इतर दोघे गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी शुभम सांगळे याची आई आली व तिने ऋषिकेश सरोदे यास हाताने मारहाण केली. प्रसाद चिंतामण उचाडे याच्या फिर्यादीवरून शुभम सांगळे, संकेत खेडेकर, अनिकेत खेडेकर, शुभम सांगळे याची आई (नाव माहित नाही) सर्व रा. तांदुळनेर ता. राहुरी यांच्या विरोधात गु.र.न 1104/2023 नुसार भादवी 307, 325, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.