तामिळनाडू | TamilNadu
तामिळनाडूतून मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षालाच संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने झालेल्या मृतांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. अशातच विधानसभेत पावसाळी अधिवेशनात या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या व प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून यावर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष एआयडीएमकेच्या सर्व आमदारांना अधिवेशनाचे सत्र संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते ई.के. पलानीस्वामी यांच्यासह एआयडीएमके पक्षाच्या सर्वच आमदारांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल बुधवारी सभागृहाच्या चालू अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. या आधी मंगळवारी दिवसभरासाठी आमदारांना निलंबित करण्यात आले होते. बुधवारी सकाळी सत्र सुरु होताच आमदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरवात केली. यानंतर गोंधळ घालणाऱ्या आमदारांना निलंबित करण्यात आले.
एआयएडीएमकेच्या आमदारांना या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला. यानुसार तामिळनाडूचे विरोधी पक्ष नेते इडाप्पाडी पलानीस्वामी आणि इतर एआयडीएमके आमदारांना या संपूर्ण विधानसभा अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
एआयडीएमके आमदारांनी प्रश्नोत्तरे सत्र तहकूब करण्याची मागणी केली होती आणि नुकत्याच झालेल्या कल्लाकुरी प्रकरणी घोषणाबाजी केली. त्यांच्या या कृतीमुळे विधानसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे अध्यक्ष अप्पावू यांनी कठोर पावले उचलत त्यांचं निलंबन केले आहे.
दरम्यान, कल्लाकुरी घटनेतील आरोपी के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे २०० लीटर अवैध दारूची चाचणी केली असता त्यात ‘मेथनॉल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा