तामिळनाडू | Tamil Nadu
तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडले. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी राज्यपालांवर शिष्टाचार भंग केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय संघर्षाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
विधानसभेच्या सत्राची सुरुवात परंपरेनुसार तामिळ गीताने झाली. मात्र, राज्यपालांनी आग्रही मागणी केली की तामिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले गेले पाहिजे. या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष अप्पावू आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, संतापलेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला.
अभिभाषण दिशाभूल करणारे
अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांनी सरकारकडून तयार करण्यात आलेले अभिभाषण वाचण्यास नकार दिला. “या भाषणात अनेक असत्य आणि दिशाभूल करणारे तथ्य आहेत. तसेच माझा माईक वारंवार बंद करण्यात आला असून मला बोलू दिले जात नाहीये,” असा गंभीर आरोप राज्यपालांनी केला. राष्ट्रगीताचा योग्य सन्मान राखला जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रसंगामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता. सभापती एम. अप्पावू यांनी राज्यपालांना सभागृहाचे नियम आणि परंपरा पाळण्याची विनंती केली, मात्र राज्यपाल सभागृहाबाहेर निघून गेले.
जाणीवपूर्वक सभात्याग केला-एम. के. स्टॅलीन
राज्यपाल आर. एन. रवी यांनी परंपरेचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक सभात्याग केला असून, हा विधानसभेचा अवमान आहे, असा आरोप मुख्यमंत्री स्टालिन यांनी केला. सरकारने तयार केलेल्या अधिकृत भाषणात राज्यपालांना स्वतःचे मत मांडण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार नाही. द्रमुकची भूमिका राज्यपालांचे पद असावे अशी नाही, तरीही आमच्या पूर्वसुरींनी या पदाचा सन्मान राखला आणि आम्हीही तीच परंपरा पाळत आहोत,” असेही स्टालिन यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांनी बोलून दाखवली नाराजी
सभागृहाबाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. “राष्ट्रगीताला योग्य सन्मान दिला जात नाही, याचे मला प्रचंड दुःख वाटते. माझ्या अभिभाषणात वारंवार अडथळे आणले गेले. मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, पण राष्ट्रगीताचा सन्मान हा सर्वतोपरी असायला हवा,” असे आर. एन. रवी यांनी म्हटले आहे.




