मुंबई । Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वादाची मालिका त्यांचा पाठलाग सोडताना काही दिसत नाही.
तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर (Ajit Pawar NCP) टिका केल्यानंतर महायुतीतील वातावरण चांगलेच तापले होते. हे प्रकरण ताजे असतानाच तानाजी सावंत यांनी आणखी एक वादग्रस्त विधान करत शेतकऱ्याची थेट औकात काढली आहे. तसेच सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही असा दम सुद्धा दिला.
धाराशिव जिल्ह्यातील एका गावात गाव संवाद दौऱ्यावेळी एका शेतकऱ्याने बंधाऱ्याच्या दरवाज्या संबंधित प्रश्न उपस्थित केला. तसेच गावच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यावर दरवाजे बसवल्यास आजूबाजूच्या शेतात पाणी जाईल, याचा फटका शेतीला बसेल अशी व्यथा मांडली. यावरून प्रश्न मांडणाऱ्या शेतकऱ्याची थेट औकात सावंत यांनी काढली. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांसोबतच (Farmers) अशा प्रकारची भाषा वापरल्याने याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : “अजित पवारांशी युती म्हणजे असंगाशी संग”; भाजप नेत्याच्या विधानामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या?
“खाली बसा आपण विकासाचं बोलायला आलो आहोत. मी इंजीनियर आहे टेक्निकल आहे. एखाद्याची सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. पंधरा वर्षे आपण कधी ब्र शब्द काढला नाही रस्त्यावर कोणी मूठभर किंवा पाठीवर मुरूम टाकला नाही. बंधारा बांधला नाही की झालं का बघितलं नाही की पाणी किती अडतय हे बघितलं नाही. गेली ३५ वर्ष झालं फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं १६००० कोटीचे बजेट आपण टाकून या शिवारात पाणी आणतोय याचा विचार करायचा नाही करायचा. आम्हालाही कळत कोणाची तरी सुपारी घ्यायची उभा राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाच्या खडा टाकायचा आम्हीही उडत्याची मोजतो आपापल्या औकातीत राहून बोलायचं औकातीत राहून विकास करायचा”, असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला दम दिला आहे.
तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राज्याच्या मंत्रिपदावर असलेल्या, एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांची औकात काढणं म्हणजे शेतकऱ्यांसमोर स्वतःची औकात दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की काल तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ज्या पद्धतीने तोंडसुख घेतलं, त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप तुम्ही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेली नाही”.
हे ही वाचा : जिल्ह्यात विधानसभेसाठी ३७ लाखांवर मतदार, महिला मतदारांची संख्या वाढली
तसेच, बैलपोळा सणाच्या तोंडावर बळीराजाला औकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री त्यांची औकात दाखवणार आहेत की नाही? मला असं वाटतं तानाजी सावंत यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रतील शेतकरी पेटून उठेल आणि तानाजी सावंत यांना औकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. असंही अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा तानाजी सावंत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान होईल असं कोणतेही वक्तव्य करू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत याना समज दिली असेल असं मुनगंटीवार यांनी म्हंटले.
हे ही वाचा : महाविद्यालयात जाताना काढली विद्यार्थीनीची छेड
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सावंत आणि वादग्रस्त वक्तव्यावरून वाद हे जणू समीकरणंच झालं आहे. फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण फुटीबाबत आपलं मत व्यक्त करतांना त्यांनी खेकड्यांचा केलेला उल्लेख, पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पकडण्यात आलेले डासांची संख्येवरून विरोधकांनी उडवलेली त्यांची खिल्ली, त्यानंतर पुण्यातील ससून रुग्ण्यालयात ‘हाफकीन’ (Hafkin) या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा तसेच उस्मानाबाद येथे हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रे दरम्यान बोलताना मराठा समाजाला आरक्षणाची खाज असं वादग्रस्त वक्तव्य करून वक्तव्यावरूनही त्यांची चांगलीच फजिती झाली होती. त्यामुळे सावंतांना जरा जपून, अशी म्हणायची वेळ मुख्यमंत्री शिंदेंवर आली असणार, असं म्हटल्यास काही वावंग ठरणार नाही.