धाराशिव । Dharashiv
सध्या सगळ्या राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने या मुद्यावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे जोरदार प्रयत्न केले. कारण यात बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची नाव आली आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांची गाडी अडवून आधी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर बेदम मारहाण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुमचा संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आली आहे. यामुळे धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे.
धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. तर, केशव सावंत हे तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटामध्ये १०० रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली होती.
कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट दिले. त्यांना टपाल असल्याचे सांगत हे पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितले. या धमकीच्या चिठ्ठीत, ‘तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग करू,’ असे लिहिण्यात आले होते. घडलेल्या प्रकरणानंतर तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड आणि सुनिल लगडे,संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून ढोकी पोलीसांकडून घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर याआधी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. १३ सप्टेंबरला रात्री अंदाजे १२ वाजता काही अज्ञातांनी त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळेस धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आला होता. सुरक्षारक्षकाने हा दावा केला होता. त्यानंतर आंबी पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावरही तपास सुरू आहे. पण या सर्व प्रकरणांमुळे तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धोकास आल्याचे म्हटले जात आहे.