Saturday, April 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : इमर्जन्सीतील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेणार नाही; भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर...

Maharashtra News : इमर्जन्सीतील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेणार नाही; भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रूग्णालयाचा मोठा निर्णय

पुणे | Pune

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील (Deenanath Mangeshar Hospital) प्रशासनावर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे (MLA Amit Gorkhe) यांचे स्विय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा पैशांअभावी उपचार केला नसल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर दीनानाथ रुग्णालयाबाहेर राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. तसेच प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करत अहवालही सादर केला होता.

- Advertisement -

यानंतर आता मंगेशकर रूग्णालयाचे वैद्याकीय संचालक डॉ. धनंजय केळकर(Dr Dhananjay Kelkar) यांनी दोन पानी पत्र जारी केले आहे. यात केळकर यांनी यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या (Children) विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये (Emergency) अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मैनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे नमुद केले आहे.

दरम्यान, धनंजय केळकर यांनी इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला असला तरी या सगळ्या प्रकाराबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चूक आहे, हे मात्र त्यांनी पूर्णपणे कबूल केलेले नाही. तसेच दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी, रुग्णालयाकडून (Hospital) रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत, असे केळकर यांनी म्हटले.

काय आहे पत्रात?

माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो,

२००१ साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.

कालचा दिवस दीनानाथ च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे. हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले. हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -‘असंवेदनशीलता’ अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा.

झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले. जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

नमस्कार.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या