मनमाड । प्रतिनिधी Manmad
मनमाड शहरापासून काही अंतरावर पानेवाडीजवळ भरधाव वेगाने जाणार्या इंधन टँकरने समोरून येणार्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले तर बालकासह त्याची आई गंभीररित्या जखमी झाली. दोघा जखमींना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की एमएच-19, ईएच-5568 सीसी या मोटारसायकल वरून एक पुरुष,दोन महिला आणि तीन लहान बालके दिवाळी साजरी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पारोळाकडे जात होते. मनमाड पासून 7 किमी अंतरावर पानेवाडी जवळ भरधाव वेगाने येणार्या एमएच-15, सीसी- 5523 या इंधन वाहतूक करणार्या टँकर ने जोरदार धडक दिली.
अपघात झाल्याचे पाहून परिसरातील ग्रामस्थ आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
या अपघातात सचिन भिकन मोहिते (30), वर्षा सचिन मोहिते (25, दोघे रा.बोरनार, ता.भडगाव), जय भाईदास बोराळे (4े), ओम भाईदास बोराळे (6, दोघे राहणार रा. वरझाई, सौंदाणे-धुळे) हे चौघे जण जागीच ठार झाले.
तर मनिषा भाईदास बोराळे (30) व त्यांचा मुलगा जगदीश बोराळे (2, दोघे रा. वरझाई) हे गंभीररित्या जखमी झाले. अपघातातील जखमी व मृत नाशिककडे मजुरी करत होते दिवाळी साजरी करण्यासाठी घराकडे जात असताना काळाने दाम्पत्यासह दोघा चिमुरड्या बालकांवर घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.