धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरालगत असलेल्या सुरत बायपासवरील चितोड चौफुलीवर आज पहाटे गुजरातकडून अकोलाकडे जाणारी टँकर उलटला. त्यामुळे टँकरमधील सोयाबीनचे कच्चे तेल नाल्यात वाहून गेले. तर चालक जखमी झाला. घटनेत सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले आहे.
चितोड चौफुलीवर उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याचे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते. आज दि. 14 रोजी आर.जे.04 जी.ए.5425 क्रमांकाचा टँकर गुजरातकडून अकोला येथे सोयाबीनचे कच्चे तेल घेवून जात होता.
पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास टँकर सुरत-बायपास रोडने जात असतांना चितोड चौफुली येथे पाईप मोेरीवर उलटला. टँकरला अपघात होत असल्याचे पाहून चालक मांगीलाल सारणे यांनी धावत्या टँकरमधून उडी घेतली. त्यात ते किरकोळ जखमी झाले आहे.
टँकर उलटल्याने सुमारे 21 लाख 72 हजार रूपये किंमतीचे सोयाबीनचे कच्चे तेल नाल्यात वाहून गेले. हा टँकर अकोला येथील भारत ऑईल इंडस्ट्रीज येथे जात होता. याबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.