नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस (Rain) पडेल, असे भाकित हवामान विभागाने (IMD) वर्तवले आहे. त्याचा प्रत्यय जूनमध्ये आला. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी निम्म्याहून अधिक तालुक्यांत सरासरीहून अधिक पाऊस झाला असून पाण्याची (Water) गरज स्थानिक पातळीवरच पूर्ण झाली आहे.
नांदगाव, मालेगाव, सिन्नर आणि चांदवड या चार तालुक्यांना पावसाने दिलासा दिला. त्यामुळे या तालुक्यांतील १३ गावे आणि २१ वाड्यांना पाणी पुरवणारे १६ टँकर पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.पाणी उपलब्धतेमुळे ३४ ठिकाणच्या २८,८९९ रहिवाशांची टँकरपासून मुक्तता झाली आहे.
गेल्यावर्षी उन्हाळ्यात सुरू झालेली टँकरसेवा पावसाळ्यासह हिवाळा आणि यंदाच्या उन्हाळ्यातदेखील सुरू होती.मागील पाच-सहा वर्षांत टँकर्सची संख्या पहिल्यांदा ४०० पर्यंत पोहोचली होती. जिल्ह्यात ३६६ गावे आणि ९४१ वाड्या अशा १,३०७ ठिकाणी ३९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जिल्ह्यातील ७ लाख २० हजार ३७२ लोकांना टँकरने पाणी देण्यात येत होते.
कळवण तालुक्यात (Kalwan Taluka) १९ गावे आणि दोन वाड्यांना पाणीटंचाई असली तरी तेथे टँकर सुरू नाहीत. तेथे २२ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तालुकानिहाय विचार करता नांदगाव तालुक्यातील ४ गावे, ३ वाड्यांना पाणी पुरविणारे ५ टँकर, मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) २ गावे, ३ वाड्यांना पाणी पुरवणारे २ टँकर, सिन्नर तालुक्यातील ४ गावे, १२ वाड्यांना पाणी पुरवणारे ७ टँकर तर चांदवड तालुक्यातील ३ गावे, ३ वाड्यांना पाणी पुरविणारे २ टँकर बंद करण्यात आले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा