मुंबई । Mumbai
बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने एक भावनिक आणि धक्कादायक व्हिडिओ शेअर करत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओत तनुश्री ढसाढसा रडताना दिसत असून, “माझ्याच घरात मला त्रास दिला जातोय,” असा गंभीर आरोप तिने केला आहे.
या व्हिडिओसोबत तिने लिहिले आहे की, “मी या त्रासाला कंटाळले आहे! हे २०१८ पासून सुरू आहे, जेव्हा मी #MeToo चळवळीचा भाग झाले. आज मी थकून पोलिसांना बोलावलं आहे. कृपया कोणीतरी मला मदत करा.” तिच्या या भावनिक आवाहनाने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, युजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
तनुश्री पुढे म्हणाली, “माझी तब्येत खूप खराब झाली आहे. मला काही काम करता येत नाही. मी घरकामासाठी मोलकरीण ठेवू शकत नाही कारण माझा अनुभव फारच वाईट राहिला आहे. त्या येऊन माझं सामान चोरतात. त्यामुळे मला सगळं स्वतः करावं लागतंय.”
तिने दावा केला की, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात आहे. “२०२० पासून रोज रात्री विचित्र आवाज माझ्या घराच्या छतावरून आणि दाराजवळून ऐकू येतात. मी बिल्डिंग मॅनेजमेंटकडे तक्रारी केल्या, पण काहीच उपयोग झाला नाही,” असंही ती म्हणाली.
या व्हिडिओखाली एका युजरने मदतीची तयारी दर्शवली असता, तनुश्रीने एक मोठा गौप्यस्फोट केला. तिच्या म्हणण्यानुसार, अभिनेता नाना पाटेकर २०१९ मध्ये त्यांच्या जुन्या मित्राकडे, चुलमन भाईकडे गेले आणि त्याला तिच्या विरोधात एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्याबाबत सांगितलं. तनुश्रीच्या आरोपानुसार, त्या वेळी चुलमन भाईने हे प्रकरण दडपण्यासाठी ५ कोटी रुपये घेतले आणि सर्व काही नियोजनबद्ध रितीने शांत केलं. यामुळे सोशल मीडियावर “चुलमन भाई नेमके कोण?” आणि “तनुश्री नेमकं कोणाकडे बोट दाखवत आहे?” यावरून चर्चांना उधाण आले आहे.
तनुश्री सध्या फारच अस्वस्थ मानसिक अवस्थेत असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट होते. तिने सांगितले की, पोलिसांनी तिला तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला असून, ती पुढील दोन दिवसांत तक्रार दाखल करणार आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील #MeToo संबंधित आरोप-प्रत्यारोपांचा विषय उफाळून आला आहे. तनुश्रीच्या या भावनिक सादानंतर तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे आणि अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. आता तिच्या पुढील कृतीकडे आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




