अनाकापल्ली । Anakapalli
आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागलेल्या भीषण आगीत एका ७० वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना यलमंचिलीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत रेल्वेचे दोन एसी डबे पूर्णपणे जळून खाक झाले असून प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटानगरहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी ही रेल्वे गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने धावत होती. रात्री साधारण १२:४५ च्या सुमारास ट्रेन अनाकापल्ली स्थानकातून सुटल्यानंतर नरसिंहबल्ली येथे रेल्वेच्या डब्यातून ठिणग्या आणि आगीच्या ज्वाळा निघताना लोको पायलटच्या निदर्शनास आल्या. प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवण्यात आली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
या भीषण आगीत बी-१ (B1) आणि एम-२ (M2) हे दोन एसी डबे आगीच्या विळख्यात सापडले. दुर्दैवाने, बी-१ डब्यातून प्रवास करणाऱ्या ७० वर्षीय चंद्रशेखर सुंदरम यांचा होरपळून मृत्यू झाला. ज्यावेळी आग लागली, तेव्हा बी-१ डब्यात ८२ आणि दुसऱ्या बाधित डब्यात ७६ प्रवासी होते. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही डबे कोळसा झाले होते. प्रवाशांचे मौल्यवान सामानही या आगीत जळून भस्मसात झाले.
आगीमुळे डब्यातून प्रचंड धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दाट धूर आणि रात्रीची वेळ असल्याने नेमकं काय घडतंय हे समजण्यापूर्वीच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या दिशेने धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे श्वास घेणे कठीण झाले होते आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अनाकापल्ली, इलामंचिली आणि नक्कापल्ली येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून जळलेले दोन्ही डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर उर्वरित प्रवाशांना सुखरूपपणे दुसऱ्या व्यवस्थेद्वारे त्यांच्या गंतव्यस्थानाकडे रवाना करण्यात आले.
रेल्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार, बी-१ एसी कोचचे ब्रेक जास्त गरम (Overheating) झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी दोन फॉरेन्सिक पथके पाचारण करण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रेल्वेचे तांत्रिक पथक या घटनेचा कसून तपास करत आहेत.




