Friday, April 25, 2025
Homeनगरसुपा उद्योगनगरी 5 वर्षांत वेगाने विस्तारणार

सुपा उद्योगनगरी 5 वर्षांत वेगाने विस्तारणार

तौरल इंडियाचे सीईओ भरत गीते || 30 एकरवर प्लांट, प्रत्यक्ष 1200 रोजगार निर्मिती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सुपा-नगरसह जिल्ह्यातील उद्योग नगरींचा विकास आतापर्यंत पूर्ण क्षमेतेने होणे अपेक्षीत होते. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न वाढवावे लागतील. या भागात तंत्रज्ञान विकास आणि उद्योग वाढीला पुढील 5 वर्षात मोठी चालना मिळेल, याचा मला विश्वास आहे. नवे सरकार उद्योगाच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे आहे. पायाभूत सुविधांसाठी सरकार सकारात्मक आहे. ग्रामीण भागाला शेतीकडून उद्योगाकडे वळवावे लागेल. तौरल इंडियाच्या माध्यमातून तोच प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती, पुरक उद्योगांचा विकास, स्थानिक महाविद्यालयांत कोर्सेसचा अंतर्भाव करून मनुष्यबळ विकास अशा अनेक योजनांवर उद्योजक, शासन, प्रशासनस्तरावर नक्कीच भरीव काम उभे राहील, असा विश्वास तौरल इंडिया कंपनीचे सीईओ भरत गीते यांनी ‘सार्वमत’शी बोलताना व्यक्त केला. सुप्यात 30 एकर जागेवर 500 कोटी रूपये गुंतवणूक केली आहे. या कंपनीत किमान 1200 रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

चर्चेच्या पहिल्या भागात श्री. गीते यांनी चाकण येथील तौरल इंडियाच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास उलगडला. त्यानंतर उद्योग विस्ताराच्या निमित्ताने त्यांनी सुपा एमआयडीसीत पाऊल ठेवले आहे. 30 एकर जागेवर तौरलचा प्रकल्प वेगाने आकार घेत आहे. पहिल्या टप्प्यात किमान 1200 जणांंना प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. टप्प्याटप्प्याने यात भर पडेल. या उद्योगासाठी पुरक व्यवसायाच्या संधीही निर्माण होतील. मनुष्यविकासाची प्रक्रीया घडेल, यावर श्री. गीते यांनी पुढील चर्चेत प्रकाश टाकला.

श्री. गीते पुढे म्हणाले, तौरल इंडियाचे प्रत्यक्षात येणे, उत्पादन सुरू होणे आणि दरवर्षी दुप्पट वेगाने उत्पादन वाढणे ही प्रक्रीया 2023-24 पर्यंत पुढे गेली होती. मागणी वाढली पण ती पूर्ण करण्यासाठी प्लँट आणि मनुष्यबळ कमी पडू लागले होते. मग विस्तारासाठी पाऊल टाकले आणि सुपा प्लाँटची कल्पना पुढे आली. पण त्याआधी एक सांगतो. माझ्या पहिल्या कंपनीसाठी चाकण पहिली पसंत नव्हती. ग्रामीण भागातच उद्योग उभारायचा, असा विचार आधीपासूनच मनात घोळत असायचा. जर्मनीत असताना जगप्रसिद्ध कंपन्या अक्षरश: खेड्यातून काम करतात हे पाहिले होते. लाँजीनेस ही जगप्रसिद्ध घड्याळ कंपनी तर केवळ 4 हजार लोकसंख्येच्या गावात आहे. ‘गावाकडे चला’ हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पाहिलेले स्वप्न आपण आजही पूर्ण करू शकलो नाही. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी प्रयत्न आणि वाव देणे सुरू ठेवले आहे. त्याआधी अटलजी, मनमोहनजी यांच्या सरकारच्या काळात प्रयत्न झाले पण हा प्रवास तातडीने पूर्ण होणार नाही. देशाचा आकार मोठा आहे. सरकार, राजकारण, प्रशासन एका दिशेने वळवणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी प्रयत्न आणि वेळ लागतो.

पुढील 20 वर्षात उद्योग विकास खेड्यापर्यंत पोहचलेला असेल, याबाबत मी सकारात्मक आहे. त्यातील लहान वाटा आपणही उचलला पाहिजे, हा विचार करूनच काम करतो. पहिल्या कंपनीसाठी चाकण निवडले, कारण काही तांत्रिक आणि तंत्रस्नेही सहकारी तेथे उपलब्ध होण्याची शक्यता अधिक होती. विदेशातून मशिनीचा चाकणपर्यंतचा प्रवास 2 दिवसांचा असेल तर तोच प्रवास मराठवाडा, विदर्भासाठी 8 दिवसांवर जातो. विद्यमान कंपनीपासून दळण-वळणाला अधिक सोयीचे होईल म्हणून सुपा एमआयडीसी विस्तारासाठी निवडली. निती आयोगाकडून आर्थिक सर्वेक्षणाची प्रक्रीया म्हणून देशातील युवा उद्योजकांची पंतप्रधान मोदीजींशी चर्चा घडविली जाते. अशा एका चर्चेत सहभागाची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधानांकडे तीन मुद्दे मांडले होते. त्यात पहिला मुद्दा होता उद्योगांच्या विकेंद्रीकरणाचा. पण आपण जेव्हा एखादा विचार मांडतो, तेव्हा त्याचे काहीअंशी पालन करण्याची जबाबदारी आपलीही असते. म्हणून ग्रामीण भागात उद्योगाची स्थापना करू हा विचार मनात घोळत होताच. बीड, धाराशीव येथेही नवा प्लाँट टाकता आला असता पण विस्तार करताना चाकणपासून लवकर गाठता येईल म्हणून सुपा निवडले. उद्योगाची एक संस्कृतीही असते. मला वाटतं ती सुप्यात चांगल्यापैकी रूजली आहे.

सुपा एमआयडीसीत 30 एकर जागेवर 500 कोटी रूपये गुंतवणूक केली आहे. या कंपनीत किमान 1200 रोजगार निर्माण होतील. पुढे काम वाढले तर रोजगारही वाढतील. पुरक उद्योग येेथेच निर्माण झाले पाहिजे, असा मानस आहे. सध्या फाऊंड्री आणली. पण या उद्योगासाठी लागणारे रसायन आजही चीनमधून आयात होते. ते रसायनही येथेच निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न आहेत. मी जेव्हा चाकणला अ‍ॅल्युमिनीयम फाऊंड्री टाकली तेव्हा हे यशस्वी होईल का, हा प्रश्न होता. पण एखादे तंत्रज्ञान तेथील कामगार म्हणा अथवा समाजजीवन म्हणा, त्यात रूजण्यासाठी 10 वर्षे लागतात. तशी मानसिकता तयार होते. ती झाली की विकास होतो. सुपा येथे अ‍ॅल्युमिनीयमच्या उद्योगाचा विकास होईल, याबाबत मी सकारात्मक आहे. यावर आधारित लहान-मोठे उद्योगवाढीला येेथे मोठा वाव आहे. भारताचा विकास केवळ तौरल इंडियाच्या माध्यमातूनच होईल, असे काही नाही. यासाठी सर्वांनीच उद्योग किंवा अन्य मार्गाने मदत केली पाहिजे.

या उद्योगाला मनुष्यबळ लागेल. त्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांना पुरक अभ्यासक्रमांसाठी पुढाकार घेता येईल. मेटलर्जी कोर्सेस डिझाईन करता येतील. त्यासाठी माझी मदत करण्याची तयारी आहे. आयटीआयमध्ये फाऊंड्री ट्रेडला चालना देता येईल. टाटा, सिमेन्ससारख्या कंपन्यांशी करार करून मनुष्यबळ विकास घडवता येईल. केवळ उद्योगविकास हेच माझे लक्ष नाही. तर सोबत सोशल इंजिनिअरींग करत समाजही विकसीत व्हावा, यावर भर आहे.
कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे या संस्थेत शिकलो, त्या संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचा 4 वर्षे अध्यक्ष आहे. संस्थेच्या मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्य आहे. तेथेही अभ्यासक्रमात काय भर टाकता येईल, याचा विचार करतो. आर्टिफिशीअल इंटेलिजन्स, मशीन लर्नींग या केवळ संकल्पना राहिलेल्या नाहीत. त्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत. नव संकल्पना स्वीकारत पुढे जावे लागेल. माजी विद्यार्थ्यांनी पुढील पिढीसाठी हात पुढे करावा, अशा संकल्पनेतून अनेकांनी मदत केली. अमेरिकेतील आशिष अचलेरकर यांनी याच भावनेतून तब्बल 8 कोटीचा निधी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिला. या संस्थेत आपल्या अभ्यासाच्या जोरावर गरिब आणि ग्रामीण घरातील विद्यार्थी दाखल होतात. अशा शंभर विद्यार्थ्यांना वार्षिक 1 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय आशिष यांनी घेतला आणि दोन वर्षापासून प्रत्येकी 1 लाखांची मदतही केली जात आहे.

त्यामुळे जेव्हा नगरमध्ये उद्योेग उभारणी सुरू केली, हीच विचारप्रक्रीया अधिक गतीमान झाली. येथील आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालयांना आपण काय मदत करू शकतो, म्हणजेच शैक्षणिक पातळीवर काही विकास घडवता आला तर तसाही प्रयत्न आहे. पण मी काही एकटाच करेल असे नाही. पुण्यातील अनेक कंपन्या दुसर्‍या प्लांटसाठी सुपा-नगरकडे वळल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक हबची घोषणा झाली आहे. सर्वांनी एकत्रितपणे वर्कफोर्स येथेच निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विकासाचा हा प्रवास मराठवाडा, विदर्भाच्या दिशेनेही गेला पाहिजे. पुढील काळात फक्त शेतीवर आपला देश विकास साधू शकत नाही. त्यासाठी ग्रामीण भागात उद्योग विस्तार करावा लागेल. कारण आपला देशात उद्योग विस्तार झाला तरच प्रगती होईल, असे माझे ठाम मत आहे. अलिकडे शेतीतही तंत्रज्ञान आले आहे. पण शेतकर्‍याचा मुलगा शिकला नाही तर हे नवे तंत्रज्ञान कसे वापरणार, हा प्रश्न आहे.

सुपा-नगर आणि आजूबाजुच्या उद्योग नगरींचा विकास आतापर्यंत पूर्ण क्षमेतेने होणे अपेक्षीत होते. पण तसे घडलेले दिसत नाही. या भागात तंत्रज्ञान विकासाला पुढील 5 वर्षात मोठी चालना मिळेल, याचा मला विश्वास आहे. नवे सरकार उद्योगाच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे आहे. पायाभूत सुविधांसाठी सरकार सकारात्मक आहे. मी चाकण आणि तळेगाव एमआयडीसीतील काही प्रश्न मांडले होते. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मकपणे या प्रश्नांच्या सोडवणूसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश केला आहे. त्याचप्रकारे सुपा दळण-वळणाच्यादृष्टीने वेगवान होईल, अशी अपेक्षा आहे. नुकतीच एक विदेशी पाहुण्यांची टीम चाकणला आणली होती. त्यांंना सुपा येथे आणता आले नाही, कारण प्रवासाला वेळ खूप लागतो. पुढील काळात दळण-वळण आणि अन्य सुविधा निर्माण झाल्या तर विकासाचा वेग नक्कीच वाढेल. सध्या केंद्रात आणि राज्यातही बहुमताचं आणि एकमताचं सरकार आहे. त्यामुळे विकास प्रकल्पांमागे जोर लावण्याची त्यांची ताकद मोठी आहे. त्याचा चांगला परिणाम सुपा येथील सारख्या एमआयडीसीच्या विकासावरही नक्कीच दिसेल, असे ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...