चहा कोणाला आवडत नाही? बहुतेक सर्वांनाच आवडतो. अर्थात त्याला काही अपवाद असतील. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. त्याला चहा तरी अपवाद कसा असणार?
चहाला बराच मोठा इतिहास आहे. चहाचा उगम चीनमधून झाल्याचे सांगितले जाते.
पुस्तकांत वाचायलाही मिळते. भारतात आलेल्या विदेशी पाहुण्यांनी सोबत चहा आणला. त्याची चव इथल्या लोकांना चाखायला दिली. तेव्हापासून भारतीयांना चहाची गोडी लागली. आता तर चहा पिणे हा सवयीचा भाग बनला आहे. काही लोकांना वेगवेगळी व्यसने असतात. मात्र अनेकांना चहाचे व्यसन असते, पण बहुतेक जण ‘सवय’ म्हणून त्याचे समर्थन करतात. भारतातील कोट्यवधी लोक चहाचे ‘चाहते’ बनले आहेत. चहा हे त्यांचे आवडते पेय बनले आहे.
सकाळी उठल्यावर बाहेर फेरफटका, व्यायाम, नंतर आंघोळ-पांघोळ आटोपल्यावर पहिल्या चहाची प्रतीक्षा प्रत्येकाला असते. चहाचा कप पुढ्यात केव्हा येतो आणि त्याचा आस्वाद केव्हा घेतो असे होते. काहींना तर झोपेतून उठल्यावर पहिला चहा अंथरुणातच हवा असतो.
असे चित्र बहुदा चित्रपटात हमखास पाहायला मिळते. पाहुणचारासाठी चहासारखे सोपे आणि झटपट होणारे मधुर पेय दुसरे नसावे. हल्लीच्या बदलत्या काळात पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी चहाऐवजी कॉफी, दूध अथवा शीतपेये देण्याचा प्रघात उच्चभ्रू वा प्रतिष्ठित घरे तसेच कार्यालयांमध्ये रुढ झाला आहे मात्र बहुतेक ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत चहाने केले जाते.
जुन्या काळात घरी आलेल्या पै-पाहुण्यांना तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा देण्याची प्रथा रुढ होती. एखाद्या घरी पाहुणा आला आणि त्याला चहापान करायला त्या घरचे यजमान विसरले तर ‘साधा चहासुद्धा विचारला नाही’ किंवा ‘त्यांना चालरितच नाही’ असे म्हणून यजमानांच्या माणुसकीवर शंका उपस्थित केली जाते.
घर असो वा कार्यालय; आलेल्या पाहुण्यांना चहापान देऊन संतुष्ट केले जाते. मग पुढची बोलणी वा सोपस्कार पार पडतात. कार्यालयात पोहोचल्यावर कामाला सुरूवात करण्याआधी चहाची अॉर्डर सोडली जाते. अॉफीस बॉय टेबलावर चहा आणून देतो. पाण्याची अथवा वातानुकूलन यंत्राची हवा खात चहापान करण्यात अनेक साहेब आणि भाऊसाहेबांना आपल्या पदाचे सार्थक झाल्यासारखे वाटत असावे.
नोकरी, व्यवसाय वा कामानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेला कर्ता पुरूष वा कर्ती स्री घरी येते. त्याचा वा तिचा दिवसभराचा शीण घालवण्यासाठी घरातील आया वा गृहिणी पाणी आणि चहा लगबगीने घेऊन येतात. घरी गेल्या-गेल्या मिळालेल्या त्या चहाने थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
चहाच्या चाहत्यांची संख्या लक्षात घेऊन अलीकडे चहाचे जोरदार मार्केटिंग सुरू झाले आहे. अमृततुल्य चहाची दुकाने मोठमोठ्या शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी थाटली गेली आहेत. त्यामुळे खवय्यांसारखी चहाच्या चाहत्यांची पावले अशा दुकानांकडे आपोआप वळतात.टेबल-खुर्चीचा अट्टाहास न करता उभ्याने चहाचा आस्वाद घेतला जातो. चहाच्या टप-यांवर दिवसभर चहा तयार केला जातो. ‘चहा’ते येतात. चहा पिऊन तलफ भागवतात. चहा तयार करणारा वा त्या टपरीचा मालक न कंटाळता येणाऱ्या ‘चहा’त्यांना चहा देऊन त्यांची तलफ भागवतात.
थंडीच्या दिवसांत वाफाळलेल्या चहाचा स्वाद घेण्याचा आनंद काही औरच! पावसाळ्यात घराच्या खिडकीत बसून बाहेर कोसळणा-या पाऊसधारा पाहत गरमागरम चहा पिण्याची हौस पुनःपुन्हा भागवावीशी वाटते. पावसाळी दिवसांत रेल्वे प्रवासात गाडी एखाद्या स्थानकावर थांबल्यावर चहावाल्याकडून घेतलेला चहा पिण्याचा आनंदही अनेकांनी अनुभवला असेल. रस्त्याने जाताना पावसाने अचानक गाठल्यावर एखाद्या चहा टपरी वा ठेवल्याचा थोडा वेळ आसरा घेऊन चहा प्यायला कोणाला आवडत नाही? उन्हाळ्यात उकडत असले तरी सकाळचा आणि सायंकाळचा चहा सहसा कोणी टाळत नाहीत.
गावाकडील चहापानाची तर तर्हाच न्यारी! बदलत्या काळाबरोबर गावातील वातावरणही आता बदलले आहे. माणसा-माणसांतील आणि घराघरातील आपुलकी काहीशी उणावली आहे. फार पूर्वी मात्र गावाकडील चित्र वेगळेच होते.
पूर्वी गावातील माणसांकडे पैसा कमी होता, पण सगळी माणसे मनाने गर्भश्रीमंत होती. एकमेकांबद्दल आपुलकी होती. जिव्हाळा होता. गावातील एखाद्या घरी पाहुणे आले तर ओळखीच्या किमान चार-पाच घरी चहा घेतल्याशिवाय त्यांची सुटका होत नसे. नको-नको म्हटले तरी चहासाठी आग्रहाने बोलावले जात असे; नव्हे हात धरून नेले जात असे. चहा तरी किती प्रकारचा आणि चवीचा! शहरात सारे काही प्रमाणात असलेला चहा पिण्याची सवय असलेल्या माणसांना प्रेमळ आग्रहामुळे वेगवेगळ्या घरातील चहाची चव घ्यावी लागे.
चुलीवरचा धुरकटलेला चहा, कमी दुधाचा किंवा बिगरदुधाचा काळा चहा, गुळाचा किंवा कमी साखरेचा कमी गोड चहा! साखरेचा चहा अभावानेच मिळे. बहुदा गुळाचाच चहा घ्यावा लागे, पण त्या चहात प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा गोडवा भरपूर असे. सुटाबुटातील पाहुण्याने आपल्या घरचा घोटभर चहा घेतला तरी गावाकडील माणसे कृतकृत्य होत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान गगनात मावत नसे.
उन्हे कलली की घरातील ज्येष्ठ मंडळींना चहाची आठवण येई. ‘किती वाजले रे पोरांनो’ असे विचारले जाई. चहाची वेळ झाली याचा अंदाज लेकी-सुनांना यायचा. मग चहाची तयारी सुरू होत असे. आजच्या सारखे चहाचे सर्व साहित्य त्यावेळी सर्वसाधारण घरांत असायचेच असे नव्हे! घरातील पोरा-सोराला चहा-साखरेसाठी दुकानात पिटाळले जाई. घरच्या शेळी-बकरीचे दूध काढले जायचे.
सगळे साहित्य जमून आल्यावर चुलीवर वा फार तर घासलेटच्या स्टोव्हवर चहा तयार होई. कपबशा धुण्याचा विशिष्ट आवाज चहापानाची लगबग सुरू असल्याचा संकेतच होता. दांडी नसलेला कप, बशीचा अभाव, कपबशा नसेल तर फुलपात्र किंवा ग्लास, वाटी अथवा छोटे ताट; असे काहीही चहा प्यायला पुरेसे असे. कपबशीवाचून फारसे आडत नसे. हे सगळे लहानपणी गावाकडे अनुभवायला मिळाले आहे. त्यावेळी चहाचे फार अप्रूप वाटत असे.
छोटेखानी गाव किंवा खेड्यापाड्यातील बसथांबा वा चौफुलीवरच्या टपरीवजा हॉटेलातील चहा इतका गुळचट असे की त्याचा घोट घेताना आणि तो संपवताना नकोसे होत असे. आता आरोग्यविषयक जागृती वाढली आहे. साखर मोजून-मापून खाल्ली जाते. त्यामुळे साखर खाण्यावर बंधने आली आहेत. ‘साखरेचा खाणार त्याला देव देणार’ अशी म्हण प्रचलित असली तरी रक्तातील साखर वाढू नये म्हणून जो-तो जपून साखरेची गोडी चालणे पसंत करतो. त्यामुळे चहा केव्हा व किती घ्यायचा त्यात साखर किती टाकायची? चहापत्ती, दूध किती असावे? ते मोजून-मापून ठरवले जाते.
आधुनिक काळात ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे कितीतरी प्रकार आढळतात. गरम पाणी वा दुधात चहापत्तीचे छोटे पॅकेट बुडवून (डीप करून) झटपट चहा बनवला जातो. चहा-कॉफीची यंत्रेही आली आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चहाची चवच न्यारी!
काही बसस्थानके वा विशिष्ट रेल्वे स्थानकांवरील चहाची चव घेण्याचा योग अनेकांना प्रवासात आला असेल. त्या चहात साखरेचे प्रमाण कमी का असते याचा विचार करीतच तो चहा संपवावा लागतो.
चहाचे फायदे-तोटे सांगितले जातात. जास्त चहा पिणे आरोग्याला घातक असल्याचे डॉक्टर मंडळी सांगतात. तरीही खवैय्यांप्रमाणे चहाचे चाहते कमी झालेले नाहीत. दिवसभरात थोडा-थोडा करून अनेकदा चहाचे घोट घेणारी माणसे कमी नाहीत. कार्यालयांमध्ये काम करणा-या बाबू लोकांना वरचेवर चहाचे घुटके घेणे अंगवळणी पडलेले असते. चहामुळे झोपमोड होते, भूक लागत नाही, असे म्हटले जाते, पण चहाच्या चाहत्यांना त्याची फिकीर नसते.
म्हणूनच सकाळी, दुपारी, सायंकाळी वा रात्री कधीही चहा प्यायला वा पाजला जातो. एकवेळ दूध पिणा-यांची संख्या कमी असेल, पण चहा पिणा-यांची संख्या नक्कीच अगणित असेल. चहा हे चलनी नाणे बनले आहे. चहा पिकवणा-या देशांत भारत दुसर्या क्रमांकावर आहे. चहाची सर्वाधिक मागणी असलेला देशही आहे. चहा प्रकृतीला कितीही वाईट असल्याचे डॉक्टर सांगत असले तरी चहाच्या चाहत्यांचे चहावरचे प्रेम कमी झालेले नाही. कमी होईल असेही वाटत नाही.
– एन. व्ही. निकाळे,
वृत्तसंपादक, देशदूत, नाशिक.