अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरसह राज्यात नुकतेच मतदार पुनरीक्षणाचे काम संपले. त्यानंतर आता इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांना 50 तासांचे एआयफ (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढले असून 30 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांना आता हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. मराठी भाषेत असणारे हे प्रशिक्षण सर्व शिक्षकांसाठी गरजेचे आणि भविष्यात उपयुक्त ठरणार असल्याचा दावा शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. हे एआय प्रशिक्षण शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकार्यांना सक्तीचे राहणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे. यात इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणार्या सर्व शिक्षकांना एआय साथी फॉर एज्युकेटर्स हा ऑनलाईन कोर्स करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. शिक्षण विभागाच्यावतीने सर्व शिक्षकांना 50 तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण सक्तीचे असल्याने आता एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे हे एआय कोर्स हा मराठी माध्यमातील पहिला कोर्स असून तो अध्यापन करणार्या शिक्षकांसह शिक्षण विभागातील अधिकार्यांना उपयुक्त ठरणार आहे. यामुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ वाचणार असून त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मोठा उपयोग या कोर्समुळे होणार आहे. तसेच संबंधीत एआय कोर्स हा सक्तीचा असला तरी तो फावल्या वेळे शिक्षकांना पूर्ण करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत सर्वच शिक्षकांना नोंदणीसाठी मुदत ठेवण्यात आलेली आहे. नोंदणीनंतर 30 सप्टेंबरपूर्वी कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.
कोर्ससाठी चार तासांचे सीपीडी (प्रगतीशील विकास) प्रशिक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना आवश्यक सूचना करून सर्व शिक्षकांची नोंदणी करून कोर्स वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या काढण्यात आलेले आहे. ते पत्र सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्य, महापालिकेचे प्रशासनाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना पाठविण्यात आले आहे. शिक्षकांसह मुख्याध्यापकांनाही प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर एक प्रश्नपत्रिका येते, त्यातील उत्तरे सोडवून ती सबमिट केल्यावर लगेचच निकाल येतो. त्यानंतर संबंधित शिक्षकास प्रशिक्षण पूर्ण केल्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळते.
शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करावा
विद्यार्थ्यांना अध्यापन करणार्या सर्व शिक्षकांना एआयची प्राथमिक माहिती असावी, म्हणून सर्व शिक्षकांसाठी हा कोर्स करावा लागणार आहे. हा कार्स माझ्यासह माझ्या विभागातील सर्व अधिकार्यांनी केलेला आहे. तो अतिषय सुंदर असून शिक्षकांसाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे तो मराठी माध्यमातील पहिला कोर्स आहे.
– डॉ. राजेंद्र बनकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर.




