Wednesday, October 23, 2024
Homeनगरशिक्षक बँकेच्या संचालक मंडळात फूट

शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात फूट

मतदानात श्रीरामपूरच्या सालकेंची चेअरमनपदी बाजी व्हाईस चेअरमनपदी शेवगावचे गोरे विजयी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दर पाच वर्षांनी शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात पडणार्‍या फुटीची परंपरा यंदा देखील कायम राहिली. सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाच्या ताब्यात बँकेची एकहाती सत्ता असताना मंगळवारी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीदरम्यान संचालक मंडळात मतदान प्रक्रिया घेण्याची वेळ आली. यावेळी गुरूमाऊली मंडळाने दिलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या उमेदवारांचा श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सालके आणि शेवगावचे संचालक रमेश गोरे यांनी पराभव केला. मतदानानंतर चेअरमनपदी सालके आणि व्हाईस चेअरमनपदी गोरे यांची निवड घोषित करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, गुरूमाऊली मंडळाच्या संचालक मंडळात गद्दारी झाली असून ऐनवेळी बाह्यशक्तीने हस्तक्षेप करत आमच्या संचालकांना फूस लावत गुरुमाऊलीच्या ताब्यातील सत्ता हिरावून घेतल्याचा आरोप मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी ‘सार्वमत’ शी बोलताना केला आहे. बँकेचे आताचे नूतन पदाधिकारी हे गुरूमाऊली मंडळाला मान्य नाहीत. संचालक मंडळातील फुट प्रकरणाला संभाजीराव थोरात कारणीभूत असून राज्यात ज्याज्या जिल्ह्यात शिक्षक बँक आणि शिक्षकांच्या संघटनेत चांगले काम सुरू होते. त्यात्याठिकाणी फुट पाडण्याचे पाप थोरात यांनी केला असल्याचा आरोप तांबे यांनी केला.
जिल्हा शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी काल संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, शिक्षक बँकेत गुरूमाऊली मंडळाचे 21 संचालक निवडून आलेल असून त्याठिकाणी बापू तांबे गटाची एकहाती सत्ता होती.

गेल्या वर्षी निवडणुकीनंतर 17 नोव्हेंबर 2023 नेवाशाचे रामेश्वर चोपडे यांची चेअरमनपदी आणि व्हाईस चेअरमनपदी निर्गुणा बांगर यांची निवड करण्यात आली होती. तेव्हापासून चोपडे हे चेअरमन म्हणून काम पाहत होते. मंडळाच्या निर्णयानूसार चोपडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी काल बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगर तालुका उपनिबंधक शुभांगी गोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सुरूवातीला गुरूमाऊली मंडळाने ठरल्याप्रमाणे चेअरमनपदासाठी पारनेरचे कारभारी बाबर यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, ऐनवेळी श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सरोदे यांनी आक्षेप घेत चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यानूसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानाची प्रक्रिया राबवली.

यावेळी चेअरमनपदाच्या निवडीत सरोदे यांनी 12 मते मिळाली तर बाबर यांना केवळ आठ मते मिळाली. यावेळी मतदानात एक चिठ्ठी कोरी निघाली. यामुळे सरोदे यांचा चार मतांनी विजय झाला. त्यानंतर मंडळाच्या निर्णयानूसार व्हाईस चेअरमन पदासाठी पाथर्डीतून कल्याण लवांडे यांचा अर्ज भरता वेळी पुन्हा मतदान घेण्याची मागणी झाली. त्यानूसार मतदान घेण्यात आले. यावेळी शेवगावच्या रमेश गोरे यांना 12 तर लवांडे यांना अवघी 9 मते मिळाली. व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीत गोरे यांनी लवांडे यांचा तीन मतांनी पराभव केला. मतदानानंतर सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाच्या संचालक मंडळात फुट पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे गुरूमाऊली मंडळाच्या शनिवारी झालेल्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत सर्व संचालकांना नूतन पदाधिकारी निवडीबाबत विचारणा केली होती.

त्यावेळी श्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहिल असे सर्वांनी सांगितले होते. त्यानंतर ऐनवळी मतदान घेवून मंडळाने दिलेल्या उमेदवारांचा पराभव हा गुरूमाऊली मंडळाला जिव्हारी लागणारा आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांना बनसोडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांनी सहाय केले. यावेळी संचालक संदीप मोटे, रामेेश्वर चोपडे, निर्गुणा बांगर, महेश भणभणे, योगेश वाघमारे, कल्याण लवांडे, आण्णासाहेब आभाळे, शिवाजी कराड, ज्ञानेश्वर शिरसाट, कैलास सोरोक्ते, सुर्यकांत काळे, बाळासाहेब सरोदे, गोरक्षनाथ विटनोर, बाळासाहेब तापकिर, सरस्वती घुले, निजाम शेख, भाऊसाहेब राहिंज, शशिकांत जेजुरकर, संतोष राऊत, रमेश गोरे, माणिक कदम, कारभारी बाबर, विठ्ठल फुंदे हे संचालक उपस्थित होते.

रोहकले गटाकडून सत्कार
शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीनंतर ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहकले गटाचे प्रविण ठुबे, अविनाश निंभोरे यांच्यासह अन्य नेत्यांनी नूतन चेअरमन सरोदे आणि व्हाईसचेअरमन गोरे यांचा सन्मान केला. दरम्यान, आमच्या संचालक मंडळाला बाह्यशक्तीने मदत केली, असा आरोप तांबे यांनी केला होता. त्या आरोपाला ठुबे आणि निंभोरे यांच्या सत्कारामुळे पुस्टी मिळाली असल्याचे तांबे गटाच्या उपस्थित नेत्यांनी सांगितले.

नूतन पदाधिकारी निवडीबाबत गुप्तता
शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडीबाबत जिल्ह्यातील सामान्य शिक्षक सभासदांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. यासह गुरूमाऊली मंडळाच्या अनेक श्रेष्ठांना देखील या निवडीसह संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती सोडा साधा निरोप देण्यात आला नसल्याचे अनेकांनी निवडीवर प्रतिक्रिया देतांना स्पष्ट केले. गुरूमाऊली मंडळात आता बाहेरच्या मंडळातून आलेल्यांचे महत्व वाढले आहे. ते सांगितील याप्रमाणे आता मंडळाचे निर्णय होत असल्याचे खंत अनेक गुरूमाऊलीच्या पदाधिकार्‍यांनी या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर व्यक्त केली.

थोरातांसोबतच्या बैठकीचा फोटा व्हायरल
शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीनंतर नगर जिल्ह्यातील गुरुजींच्या राजकारणातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर नूतन चेअरमन सरोदे यांच्यासह शिक्षक नेते संभाजी थोरात यांच्यात बैठक झाल्याचा फोटा व्हायरल झाला होता. या बैठकीत सरोद बैठकीच्या मध्यभागी असून यावेळी थोरात, आबासाहेब जगताप, प्रवीण ठुबे, अविनाश निंभोरे यांच्यासह थोरात गटाच्या शिक्षक नेत्यांसह गुरूमाऊलीचे काही माजी नेते दिसत आहेत. या बैठकीत थोरात यांनी तांबे गटाच्या संचालकांना आपल्या बाजूला ओढून घेतल्याचा आरोप तांबे गटाकडून होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या