Thursday, September 12, 2024
Homeनगरशिक्षक बँकेच्या व्याजदरात कपात

शिक्षक बँकेच्या व्याजदरात कपात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कर्ज व्याजदरांमध्ये 1 ऑक्टोबरपासून 0.35 टक्के कपात करण्यात आली आहे.

- Advertisement -

आता शिक्षक बँकेचा कर्जाचा व्याजदर 9.90 टक्के केला असल्याची माहिती माहिती बँकेचे चेअरमन शरदभाऊ सुद्रिक यांनी दिली. तसेच बँकेतील गुरूमाऊली मंडळ हे सभासदांचा विचार करत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

काही दिवसापासून सत्ताधारी गुरुमाऊली मंडळ तसेच विरोधी गटाकडून देखील व्याजदरांमध्ये कपात करण्याची मागणी केली जात होती. परंतु करोनामुळे या वर्षाची आर्थिक स्थिती खालावली असल्याने बँकेच्या व्याजदराबाबत निर्णय घेण्यास संभ्रमावस्था होती.

व्याजदर कमी करण्याबाबत बँकेच्या संचालक मंडळाचा अभ्यास गट नियुक्त करण्यात आला होता. या अभ्यास गटाने व्याज दर कपातीबाबत प्रतिकूलता दर्शविली होती. परंतु सभासदांची वाढती मागणी लक्षात घेता चालू आर्थिक वर्षातील उर्वरित सहा महिन्यांसाठी हा व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या मंडळाच्या सभेमध्ये जिल्ह्यातील सर्वच गुरुमाऊली सभासदांनी कर्जाचा व्याजदर कमी करण्याबाबत आग्रही मागणी केली. त्यामुळे संचालक मंडळाला हा निर्णय घेणे भाग पडले असेही त्यांनी सांगितले.

बँकेचे एकूण झालेले कर्ज वितरण, त्यावर मिळणारे व्याज, बँकेतील एकूण ठेवी आणि त्यावर दिले जाणारे व्याज यांचा ताळमेळ घालून सदर निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती व्हाईअस चेअरमन अर्जुन शिरसाट यांनी दिली. 2016 मध्ये गुरुमाऊली मंडळाची बँकेत सत्ता आल्यानंतर 11 टक्के असलेला व्याजदर कमी करून आज 9.90 टक्क्यांवर आला आहे. बँकेच्या इतिहासात सतत व्याज दर कमी करण्याची घटना कधी घडली नाही.

पूर्वी निवडणुका झाल्यावर 2 टक्के व्याजदर वाढवले जात होते. मात्र या विद्यमान संचालक मंडळाने जाहीरनाम्यात दिलेल्या शब्दाप्रमाणे व्याजदरात वाढ न करता तो सातत्याने कमी केला आहे.

बँकेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ठेवी आलेल्या असून समाजाचा आणि सभासदांचा विश्वास संपादन केला असल्याने या ठेवींना देखील चांगला व्याज देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात शिक्षक बँकेच्या ठेवीचे व्याज दर सर्वाधिक असल्याने मोठ्या प्रमाणात ठेवीचा बँकेकडे ओघ सुरू आहे असेही सुद्रिक व शिरसाठ त्यांनी सांगितले.

दरम्यान गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष तांबे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे संचालक मंडळाने व्याजदरात कपात केली असून भविष्यात बँकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायम ठेवीवर यावर्षी देखील सभासदांना चांगल्या प्रकारचे व्याज दिले जाईल अशी ग्वाही बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी दिली. बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, माजी व्हाईस चेअरमन विद्युलता आढाव, सीमाताई निकम, नाना बडाख, बाळासाहेब मुखेकर या आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या