Friday, November 22, 2024
Homeनगरआंतर जिल्ह्याची, जिल्हांतर्गतवर मात !

आंतर जिल्ह्याची, जिल्हांतर्गतवर मात !

प्राथमिक शिक्षण विभाग || 125 गुरूजी जिल्ह्यात स्वगृही परतले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, मग नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता यामुळे आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यांतून बदलून आलेले 125 प्राथमिक शिक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर मंगळवारी या शिक्षकांना आपापल्या तालुक्यांत रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. दरम्यान, आंतर जिल्हा बदली शिक्षक आणि जिल्हांतर्गत बदलीसाठी पात्र शिक्षकांमध्ये स्पर्धा लागली होती. या स्पर्धेत आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांनी जिल्हांतर्गत शिक्षकांवर मात केल्याची चर्चा सोमवारी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू होती.

- Advertisement -

दरम्यान, नोकरीच्या पहिल्या दिवसांपासून आंतर जिल्हा बदलीने नगरला आलेेले हे शिक्षक परजिल्ह्यात कार्यरत होते. यातील काहींना 10 तर काहींना त्याहीपेक्षा अधिक काळ दुसर्‍या जिल्ह्यात झालेला होता. अनेकजण कोकण, मुंबई अशा दूरवर कार्यरत होते. या शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यात बदली मिळावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालवले होते. परंतु दरवर्षी मर्यादित जागा असल्याने सर्वांना सामावून घेता येत नव्हते. यावर्षी मात्र या शिक्षकांना संधी मिळाली. त्यानुसार त्यांच्या जिल्ह्यातून ते कार्यमुक्तही झाले. परंतु नगर जिल्हा परिषदेत हजर होताना त्यांना लोकसभा निवडणूक व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचा अडसर आला. आता आचारसंहिता संपल्याने जिल्हा परिषदेने या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत 9 जुलै रोजी समुपदेशन प्रक्रिया पार पाडली.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय 23 मे 2023 च्या तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने अहमदनगर जिल्ह्यात हजर झालेल्या 125 प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना करण्यासाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी नियोजन करून मंगळवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली. या प्रक्रियेमध्ये प्रथम पेसा क्षेत्रात इच्छुक असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. नंतर संवर्ग 1 तसेच संवर्ग 2 व शेवटी सर्वसाधारण या प्राधान्यक्रमाने हजर प्राथमिक शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना देण्यात आली. रिक्त जागा जास्त असल्याने अनेकांना यात आपापला तालुकाही मिळाला.

रिक्त जागांवर मिळणार शिक्षक
जिल्ह्यात सध्या प्राथमिक शिक्षकांची 436 पदे रिक्त आहेत. आता 125 शिक्षकांना पदस्थापना दिल्याने शाळास्तरावर रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकांची नियुक्ती होऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील रिक्त पदांची संख्या कमी होणार आहे.आंतरजिल्हाप्रमाणे जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून आहे. त्यासाठी 3 हजार 800 शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत. परंतु त्याला अद्याप मुहूर्त लागलेेला नाही. काही जिल्ह्यांत अशा बदल्या झाल्या. मात्र नगर जिल्हा परिषद ही प्रक्रिया राबवणार आहे किंवा नाही? याबाबत शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या