धुळे – Dhule :
शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शिवारात वादळी वार्यासह पाऊस झाला. त्यावेळी शिक्षकाच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
शेतातील कपाशी पिकाच्या निंदणीचे काम करणार्या मजुरांवर देखरेख करण्यासाठी शिक्षक त्यांच्या पत्नी सोबत शेतात गेले होते. त्यावेळी ही दुदैवी घटना घडली.
शिरपूर शहरातील वाल्मिक नगरात राहणारे अशोक शिवराम मोरे हे शिंदखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी अलकाबाई यांच्या सोबत ताजपूर शिवारात असलेल्या शेतात मोटार सायकलीने गेले होते.
ताजपूर शिवारात असलेल्या शेतात कपाशीची लागवड केलेली होती. आज शेतात निंदणीचे काम सुरु होते. त्यामुळे दहा ते पंधरा मजूर तेथे काम करीत होते. त्यामुळे मोरे दाम्पत्य हे देखरेखीसाठी गेले होते.
सकाळी 11 वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाला. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु झाला व वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी बांधावर अशोक मोरे हे उभे होते. अचानक जोरदार आवाज येवून अशोक यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे निंदणी करणारे मजूर जागेवरुन पळू लागले. त्याच वेळी मोरे यांच्या अंगावर वीज पडल्याचे एकाच्या लक्षा आले. मजूर व शेतकर्यांनी तेथे धाव घेतली. परंतू होरपळून अशोक मोरे यांचा मृत्यू झाला.
अलकाबाई यांनी घटनेची माहिती घरी दिली. एका वाहनातून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून अशोक मोरे यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.