Saturday, July 27, 2024
Homeनाशिकशिक्षकाने साकारले १०० फुट लांबीचे वारली पेंटिंग

शिक्षकाने साकारले १०० फुट लांबीचे वारली पेंटिंग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीने (Maharashtra Tribal Warali Painting) जगाला मोहिनी घातली आहे. मनमोहक अशी ही साधीसुधी चित्रे लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच सकारात्मक ऊर्जा देतात.मराठा विद्या प्रसारक संस्थेतील निवृत्त कलाशिक्षक गोविंद कोठावळे यांनी आपल्या बंगल्याच्या कंपाऊंड वॉलवर आकर्षक चित्रे रंगवली आहेत. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत येणारे सण, उत्सव, समारंभ रेखाटून संपूर्ण वर्ष सलगपणे चित्रित केले आहे. १०० फूट लांबीची ही भिंत आकर्षक वारली चित्रांनी सजली आहे….

- Advertisement -

सेवानिवृत्तीपूर्वीच लॉकडाऊनमध्ये सलग भित्तिचित्र करावे अशी कल्पना त्यांच्या मनात घोळत होती. आधी त्यांनी भारतीय अलंकारिक चित्रशैलीत आपली संस्कृती, परंपरा रेखाटण्याचे ठरवले पण त्यासाठी जागा अपुरी पडेल असे वाटल्याने काय करावे असा विचार करीत असतानाच पी. टी. जाधव व अशोक ढीवरे या कलाशिक्षक मित्रांनी वारली चित्रशैलीत भित्तिचित्र रंगविण्याची कल्पना सुचवली.

कोठावळे लगेचच कामाला लागले. दररोज २ – ३ तास काम करून त्यांनी गेरू रंगाच्या पार्श्वभूमीवर ऍक्रिलीक पांढऱ्या (acrylic color) रंगात चित्ररेखाटन केले.चित्रांच्या वरील बाजूला यलो ऑकर तर खालील बाजूला गडद रंग दिल्याने चित्र अधिकच उठावदार झाले आहे. ते म्हणाले, यासाठी मला पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांच्या वारली चित्रसृष्टी पुस्तकांचा तसेच त्यांच्या नव्या लेखमालेचा खूप आधार झाला. त्यांना गुरुस्थानी मानून मी बघताबघता १०० फूट भिंत सजवली.

सपाट भिंत सरळ ठेवण्याऐवजी तिला आकर्षक आकार दिला आहे. कोठावळे यांनी नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात फाउंडेशन कोर्स, धुळ्यातून आर्ट टीचर्स डिप्लोमा (Art teacher diploma) तर मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्ट (J J school of art Mumbai) मध्ये आर्ट मास्टर कोर्स पूर्ण केले. पुढे नोकरी करताना जी. डी. आर्ट कोर्स पूर्ण केला. २००५ पर्यंत त्यांची उंटवाडी परिसरात शेती होती.

तेथेच त्यांनी नंतर सरस्वती हा बंगला स्वतःच्या डिझाइननुसार बनवून घेतला. पुढे उत्तम लॉन, बाग तयार केली. आता बाजूच्या भिंतीवरील वारली चित्रांनी सौंदर्यात भर घातली आहे. या चित्रणासाठी पत्नी सौ. मंगल, मोठा मुलगा आकाश व त्याची वास्तुविशारद पत्नी अनन्या, धाकटा मुलगा किरण व त्याची पत्नी गीताली यांचे संपूर्ण सहकार्य व प्रोत्साहन मिळाल्याचे गोविंद कोठावळे यांनी सांगितले.

गुढीपाडव्यापासून ही चित्रमाला सुरू होते. रामनवमी, रथयात्रा, हनुमान जयंती नंतर वैशाखातली अक्षयतृतीया व ज्येष्ठातली वटपौर्णिमा रंगवली आहे. आषाढात नृत्यात मग्न झालेले मोर दिसतात. श्रावणात नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन हे सण सजतात. भाद्रपद महिना हरितालिका, गणेशोत्सव घेऊन येतो.

अश्विन महिना घटस्थापना, नवरात्रातले दांडिया नृत्य, कोजागरी पौर्णिमा यांच्या उत्साहाने रंगतो. कार्तिकात दिवाळी,भाऊबीज, तुलसीविवाह चित्रांकीत झाले आहेत. मार्गशीर्षात पाड्यांवर होणारे विवाहसोहळे चित्रांची रंगत वाढवतात.पौष महिन्यात मकर संक्रांत, इंग्रजी नववर्षारंभ, प्रजासत्ताक दिन रेखाटले आहेत. माघात हळद फोडणे, विवाह समारंभ, गावातील जत्रा दिसते. फाल्गुनात होळी, रंगपंचमी झाली की वर्ष संपते.

या सलग चित्रणात देवचौक, तारपा नृत्य, निसर्ग सौंदर्य यांचाही समावेश आहे. चैतन्यशील मानवाकृती तसेच दैनंदिन जीवन, पशुपक्षी, घरे यांचे दर्शन चित्रात घडते. चिकाटीने त्यांनी हे चित्र पूर्ण केले. त्यांना मिळालेले समाधान व आनंद इतरांनी घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. उंटवाडी भागातील कालिका पार्क येथील सरस्वती बंगला व तेथील वारली भित्तिचित्र आवर्जून प्रत्यक्ष बघण्याजोगे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या