Wednesday, May 29, 2024
Homeनगरकराटे शिक्षकाने विवाहितेला छळले

कराटे शिक्षकाने विवाहितेला छळले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कराटे क्लासच्या शिक्षकाने विवाहितेचा पाठलाग करून वारंवार लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने विवाहितेने शरीराला हानिकारक असलेल्या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुनील भिमाजी धीवर (रा. कृष्णनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या कराटे शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी उपनगरात राहत असून एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करतात. त्यांनी दोन्ही मुलींचे कराटे क्लास सुनील धीवर याच्याकडे लावले होते. तो मुलींच्या क्लासच्या निमित्ताने फिर्यादीला वारंवार फोन करत होता. फिर्यादीने त्याला फोन करण्याचा जाब विचारला असता त्याने लग्न करण्याची मागणी करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर फिर्यादीने त्याच्याकडे कराटेसाठी मुलींना पाठविणे बंद केले.

दरम्यान, धीवर याने पुन्हा फिर्यादीला फोन करून व घरी येऊन त्रास देणे सुरूच ठेवले. मुलींना उचलून घेऊन जाईल, घरच्यांना ठार मारील, अशी धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने रविवारी (दि. 8) रात्री सव्वा आठच्या सुमारास शरिराला हानिकारक असलेल्या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले. त्याचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या