अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिकवायचे सोडून शासन प्राथमिक शिक्षकांना इतर कामांत जुंपत असल्याने शिकवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तातडीने ही अशैक्षणिक कामे बंद करावीत व शिक्षकांना केवळ शिकवू द्यावे, यासह शिक्षकांची कंत्राटी भरती रद्द करावी, या व इतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील 9 हजार प्राथमिक शिक्षकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
सततच्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे. 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे. 15 मार्च व 5 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयामुळे या असंतोषात भरच पडली आहे. विशेष म्हणजे या शासन निर्णयामुळे शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदीचा भंग केला जात आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी बुधवारी शाळा बंद ठेवून हा मोर्चा आपापल्या जिल्ह्यात काढला.
नगर जिल्ह्यात अकरा हजार प्राथमिक शिक्षक आहेत. त्या सर्वांनी या मोर्चासाठी आधीच सामूहिक रजा घेतली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता गुलमोहर रस्त्यावरील आनंद शाळेपासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शासन धोरणाच्या विरोधात घोषणा देत शिक्षकांनी परिसर दणाणून सोडला. शिक्षक-शिक्षिका उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झाले होते. सुमारे तीन तास शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामोर ठिय्या देत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला. शिक्षकांच्या या आंदोलनाला खा. निलेश लंके यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.
शिक्षक समन्वय मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे बापूसाहेब तांबे, राजेंद्र ठोकळ, राजेंद्र शिंदे, सिताराम सावंत, बबन गाडेकर, दत्ता कुलट, विद्या आढाव, बाबासाहेब सालडे, प्रवीण झावरे, प्रवीण ठुबे, नाना गाढव, संजय कळमकर, कल्याण लवांडे, गोकुळ कळमकर, अशोक नवसे, शरद वाढेकर, संतोष दुसुंगे, गजानन जाधव, सुनील शिंदे, संजय धामणे, प्रदीप दळवी, संतोष खामकर, एकनाथ व्यवहारे, अरविंद थोरात, गणेश महाडिक, नवनाथ राठोड, सचिन नाबगे, साहेबराव अनाप, सुनील पवळे, अर्जुन शिरसाठ, संतोष सरोदे, गा. मा. मिसाळ, नवनाथ अडसूळ, दत्ता जाधव, प्रकाश नांगरे, नारायण पिसे, विजय महामुनी यांच्यासह हजारो शिक्षक सहभागी झाले.
शिक्षकांच्या मागण्यांसाठी लढणार : आ. तांबे
शिक्षकांना दिलेल्या ऑनलाईन कामामुळे गोरगरीब जनतेची मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत. सरकारचा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा डाव आहे की काय? असा सवाल करत शिक्षकांच्या प्रत्येक मागणीसाठी आवाज उठवणार असल्याची भावना आ. सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. सततच्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या वारंवारितेमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे. 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन असल्याचे आ. तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.