Saturday, July 27, 2024
Homeनगरगुरूजी शोधणार शाळेतील कुणबीच्या नोंदी

गुरूजी शोधणार शाळेतील कुणबीच्या नोंदी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शाळा सोडल्यांच्या दाखल्याच्या रजिष्टरमध्ये कुणबीच्या नोंदी शोधण्याची माहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हा भरातील शिक्षकांना याबाबतचे आदेश दिले असून येत्या दोन दिवसात ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या उपस्थितीत विविध शासकीय यंत्रणांची बैठक झाली. या बैठकीला महसूल, जिल्हा परिषद यासह अन्य शासकीय विभागाचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शासकीय दस्तावेजातील कुणबीची नोंदणी शोधण्याच्या कार्यपध्दतीनवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विभागीय महसूल आयुक्त यांनी महसुलसह जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्य आणि अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली.

पुढील दिवसात जिल्ह्यात सर्व शासकीय विभागाच्यावतीने महसूल अभिलेखे खसारा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर, सन वही व सातबारा उतार, 1951 नमुना नंबर 1, नमुना नंबर 2, हक्क नोंद, जन्म-मृत्यु रजिस्टर गाव नमुना क्रमांक 14, शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही-जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अभिलेखे अनुन्याप्ती नोंद वहया, मळी नोंद वही, ताडी नोंदवही अस्थापना अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेखे रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही, पोलीस विभाग गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफआयआर रजिस्टर, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी रजिस्टर, डे बुक करार खत, साठेखत, इसार पावती भाडे चिट्ठी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्र, इच्छापत्रक, तडजोड पत्र ई दस्त, भूमि अभिलेख विभाग पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासेस रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वफ्फ अधिकारी यांचे कडील मुंतखब, शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवा तपशील सन 1967 पूर्वीचे कर्मचार्‍यांचा सेवा तपशील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे आदींची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व अभिलेख तसेच तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी तपासणी करण्यात येणार आहे.

यातील एक भाग असणार्‍या प्राथमिक आणि माध्यमिक शाळामधील शाळा सोडल्याच्या दाखल्यातील रजिष्टमधील कुणबीच्या नोंदी गुरूजी (प्राथमिक शिक्षक) हे तपासणार आहे. हे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. यासाठी सोमवारी सायंकाळी त्यांनी तालुका गटशिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेवून त्यांना सुचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या