अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणार्या विद्यार्थिनींचा कॉलेजमधील एका शिक्षकाने लैंगिक छळ केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणार्या पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षक अमित खर्डे याच्याविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे शिक्षक अमित खर्डे याने 10 एप्रिल रोजी सकाळी तिला व तिच्या इतर तीन वर्गमित्र-मैत्रिणींना वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले. तिथे त्यांनी आयडीकार्ड वाटप केल्यानंतर पुन्हा फिर्यादीला फोन करून एकटीला वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले आणि तिचा हात पकडून, तू नको टेन्शन घेऊ, मी तुला काही होऊ देणार नाही, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी सायंकाळीही त्यांनी तिला कॉलेजच्या गोडावूनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
तिच्यानंतर तिची मैत्रीण हिनेही असाच अनुभव तिच्यासोबत घडल्याचे सांगितले. खर्डे याने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची माहिती मैत्रिणीने दिली. या प्रकरणाची माहिती त्यांच्या घरी सांगितल्यानंतर विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी खर्डे याला ताब्यात घेत अटक केली आहे.