अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्वाचे तसेच घटस्फोटाचे खोटे दाखले सादर करून बदली करून घेतलेल्या सुमारे 200 शिक्षकांची हवा टाईट झाली आहे. गेल्या पाच वर्षात म्हणजे 2017 ते 2022 या काळात बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि बदलीचे कारण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून नगरच्या कोतवाली पोलीसांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याप्रकरणी नगरमधील शिक्षक विकास भाऊसाहेब गवळ जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह कोतवाली पोलीसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनूसार कोतवाली पोलीसांनी बदली झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली आहे.
गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे आंतरजिल्हा बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी व्हावी, अशी मागणी होत होती. मात्र, शिक्षण विभागाने फारसे गांर्भियाने हे प्रकरण घेतले नव्हते. मात्र, अखेर शिक्षक गवळी यांनी केलेल्या अर्जानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने त्यांच्या अर्जाचा तपास कोतवाली पोलिसांकडे दिला असून कोतवाली पोलीस स्टेशनने याबाबत आता जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांकडे माहिती मागितली आहे. त्यामुळे ज्यांनी अशा प्रकारचे दाखले देऊन बदल्या करून घेतल्या असे शिक्षक हवालदिल झाले आहेत. 2017 व 2022 साली झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले दिले.
तसेच महिला शिक्षकांनी घटस्फोट घेतल्याची खोटी कागदपत्रे सादर करून बदली करून घेतली. मात्र, ज्या नवर्यापासून घटस्फोट घेतला त्याच्याबरोबर आजही त्यांचा संसार सुरू आहे. ही बाब सर्व जिल्ह्याला माहिती आहे. मात्र, याबाबत आत्तापर्यंत कोणी लेखी तक्रार केली नव्हती. पण गवळी यांनी याबाबत पुढाकार घेऊन थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून संशयतांची नावे देखील त्यांनी दिली होती. त्यावरून अशा दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी आहे. त्यांचे अर्जानुसार कोतवाली पोलिसांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेल्या पाच वर्षाच्या काळात आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या सर्व शिक्षकांची यादी मागितली असून त्यांच्या बदलीचे कारण देखील विचारले आहे. या कारवाईमुळे बोगस पद्धतीने बदल्या करून घेणार्या शिक्षकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे.
यापूर्वी 2010-11 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये 76 शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देऊन अपंग योजनेचा लाभ घेतला होता. तसेच बदल्या ही करून घेतल्या होत्या. याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आणि शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर यांनी या प्रकरणात चौकशी करून आढळलेल्या दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली होती. हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असून त्याबाबतही अद्याप पुढील कारवाई झालेली नाही. यामुळे आंतरजिल्हा बदल्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे बोगस अपंगत्व व महिला शिक्षकांनी बोगस घटस्फोट दाखवून बदल्या करून घेतल्याची प्रकरणे जिल्ह्यात चर्चेत आहेत. परंतु याबाबत कोणी पुढाकार घेऊन तक्रार करीत नसल्याने कारवाई केली जात नव्हती. मात्र आता गवळी यांनी तक्रार करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे.
घटस्फोटीत एकाच गाडीवर फिरतात
आंतरजिल्हा बदलीचा लाभ घेतलेले काही जोडपे एकाच गाडीवर फिरतांना दिसतात. बदलीसाठी घटस्फोट दाखवणार्या या जोडप्यांबाबत शिक्षण विभागातील एका बड्या अधिकार्याने गौप्यस्फोट केला. पुढील आठवड्यात सोमवारी अथवा मंगळवारी कोतवाली पोलीसांच्या मागणीनूसार 2017 ते 2022 या पाच वर्षात बदलीचा लाभ घेतलेल्या सुमारे 200 शिक्षकांची माहिती पाठवण्यात येणार असल्याची माहिती या अधिकार्याने ‘सार्वमत’ला दिली.