Tuesday, September 29, 2026
HomeनगरAhilyanagar : शिक्षक बँकेच्या कर्ज व्याजदरात मोठी कपात

Ahilyanagar : शिक्षक बँकेच्या कर्ज व्याजदरात मोठी कपात

गुरूमाऊलीचे नेते बापू तांबे यांची घोषणा || डीसीपीएससाठी कुटुंब आधार निधी 21 लाख

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत डीसीपीएसधारक शिक्षक सभासदांच्या कुटुंब आधार निधी 15 लाखावरून 21 लाख रुपये वाढ करण्यात आली. तसेच बँकेच्या शैक्षणिक, वाहन व गृहकर्जाच्या व्याजदर 7 टक्के करण्याचा निर्णय गुरूमाऊली मंडळाचे नेते बापू तांबे यांनी जाहीर केला.
शिक्षक बँकेची सर्वसाधारण रविवारी पार पडली. सभेला चेअरमन सरस्वती घुले, संचालक शिवाजी कराड, गोरक्षनाथ विटनोर, ज्ञानेश्वर शिरसाठ, बाळासाहेब तापकिर, योगेश वाघमारे, बाळु सरोदे, रमेश गोरे, रामेश्वर चोपडे निर्गुणा बांगर, संदीप मोटे, कैलास सारोक्ते, भाऊराव राहिंज, महेश भणभणे, सुर्यकांत काळे, शशिकांत जेजूकर, सतोषकुमार राऊत, कल्याण लवांडे, आण्णसाहेब आभाळे, माणिक कदम, कारभारी बाबर बँकेचे अधिकारी गणेश पाटील, जयसिंग म्हस्के उपस्थित होते.

- Advertisement -

सभेत गुरूमाऊलीचे नेते बापू तांबे यांनी आपल्या भाषणात विविध घोषणा केल्या. यात बँकेतर्फे दिल्या जाणार्‍या आचार्य दोंदे व भा. दा. पाटील पुरस्काराच्या रक्कमेत दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. कर्ज मर्यादेत पाच लाख रुपयांची वाढ करण्यात आली. जामीन कर्जनंबर एकमध्ये 0. 15 कपात करण्यात आली. आता कर्जाचा दर 8.25 राहणार आहे. संचालक कल्याण लवांडे यांनी स्वागत केले तर श्रद्धांजली ठरावाचे वाचन बँकेचे व्हाईस चेअरमन कराडी यांनी केले. प्रस्ताविक भाषणामध्ये चेअरमन घुले यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि योजनांची माहिती दिली.

अनेकजण ‘तराट’
रविवारी झालेल्या शिक्षक बँकेच्या सभेत अनेकजण ‘फुल तराट’ असल्याचे दिसले. हाती विविध बॅनॅर घेवून ते व्यासपीठासमोर गोंधळ घालत होते. यावेळी एका शिक्षक नेत्याने दुसर्‍या शिक्षक नेत्याला ‘नाकतोडा’ अशी उपमा दिली. काही शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून जातांना दिसले. विशेष म्हणजे कल्याण रोडवर ज्या लॉनवर ही सभा होती. तिच्या शेजारी परिमट रूम होते. या ठिकाणी अनेकांनी ‘गरम चहावर’ ताव मारल्याचे दिसून आले.

दर्शनाचा ठुबे यांचा आरोप
शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या संख्याने महिला शिक्षकांना सत्ताधार्‍यांनी आणले. या शिक्षकांच्या प्रवासासाठी सत्ताधारी मंडळाच्यावतीने खासगी बससेवा देण्यात आली. सभा संपल्यानंतर महिलांना मोहटा देवी दर्शनासाठी नेण्यात येणार असल्याचा आरोप शिक्षक प्रविण ठुबे यांनी सभेत केला. यावेळी विरोधी मंडळाचे नेते सीताराम सावंत, विजय देठे, दिनेश खोसे, रघुनाथ झावरे, एकनाथ व्यवहारे यांच्यासह अन्य शिक्षक नेते उपस्थित होते.

दिवाळीनंतर विशेष सर्वसाधारण सभा
सर्वसाधारण सभेपूर्वी गाजलेला शिक्षक बँकेच्या शेड्यूल बँकेचा विषय पुढील सभा होईपर्यंत स्थगित करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष दुसुंगे यांनी या विषयावर सभासदांनी सखोल चर्चा करावी आणि हा विषय पेंडीग ठेवण्याची आवाहन सभेत केले. त्यावर बापू तांबे यांनी हा विषय स्थगित करण्याची घोषणा केली. तसेच दिवाळीनंतर तीन ते चार महिन्यांनी या विषयावर विशेष सभा बोलवण्यात येईल, अशी घोषणा केली.

पोलिसांच्या हस्तक्षेपावर आक्षेप
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा ही शिक्षक सभासद यांच्यासाठी मर्यादित असते. सभेच्या ठिकाणी सत्ताधारी गटाच्यावतीने पोलीस बंदोबस्त मागणी केल्यास तो मिळतो. मात्र, संबंधीत पोलीस हे सभागृहाबाहेर ठेवणे बंधनकारक आहे. शिक्षकांच्या सभेत पोलीस सभागृहात येवून प्रत्यक्षात कामकाजात हस्तक्षेप करून शकत नाहीत, असे असतांना रविवारी सभेदरम्यान पोलीस कर्मचारी सभेच्या कामकाजात हस्तक्षेप करतांना दिसले. यावर माजी चेअरमन नारायण राऊत आणि आबासाहेब जगताप यांनी नाराजी व्यक्त केली.

एकाच वेळी छापा-काटा अशक्य : तांबे
शिक्षक बँकेत विरोधकांना नाण्याच्या छापा आणि काटा या दोनही बाजू एकाच वेळी हव्या आहेत. मात्र, ते शक्य नाही. एका वेळी व्याजदर कमी केला तर शेड्यूल बँक होणार नाही आणि शेड्यूल बँक केली तर व्याजदर कमी होणार नाही. एकाच वेळी एकच गोष्ट शक्य आहे. मात्र, विरोधकांना एकाच वेळी नाण्याच्या छापा आणि काटा या दोनही बाजू हव्या आहेत. ते शक्य नसल्याचे सांगत सर्वसाधारण सभेच्या सभागृहात सर्व शिक्षकांनी विरोधक आणि सत्ताधारी ऐवजी शिक्षक म्हणून एकत्र निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.

तांबे लोकशाही मानणारे : अनाप
सर्व निर्णय लोकशाही मार्गाने झाल्याचे सभासद साक्षीदार आहेत. आज सभागृहात 85 टक्के सभासद तांबे यांच्या बाजूने होते. तांबे हुकूमशाही नाही तर लोकशाही मानतात आणि म्हणूनच सभासदांमध्ये गैरसमज निर्माण झाले असल्याने शेड्युल बँकेच्या संदर्भातील ठराव त्यांनी स्थगित केला. जर त्यांनी हुकूमशाहीच दाखवली असती तर बहुमताच्या जोरावर ते हा निर्णय मंजूर करू शकले असते असे साहेबराव अनाप म्हणाले.

चार-दोन कार्यकर्त्यांनी बहिष्कार : गाडेकर
बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती. मात्र, सभासदांची आपल्या बाजूने उपस्थिती कमी असल्यामुळे प्रवीण ठुबे यांची नाराजी लपून राहिली नाही. सत्ताधार्‍यांना नाव ठेवण्यासाठीच त्यांच्या चार-दोन कार्यकर्त्यांनी फक्त जेवणावर बहिष्कार घातला. जिल्ह्यातील सभासदांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याचे बबन गाडेकर यांनी सांगितले. नेते बापूसाहेब तांबे यांनी सर्व आरोपाचे सडेतोड खंडन करून विरोधी नेत्यांच्या आरोपातील हवा काढली.

‘कंत्राटी’ विरोधात शाखानिहाय आंदोलन : ठुबे
सत्ताधार्‍यांनी सभेत जेवणासाठी ब्रेक घेतल्यानंतर विरोधी मंडळाच्यावतीने प्रविण ठुबे यांनी सभागृहात दुसर्‍यांदा प्रतीसभा घेतली. यावेळी त्यांनी शिक्षक बँकेतील कंत्राटी भरती विरोधात आता जिल्हाभर बँकेच्या शाखानिहाय आंदोलन करण्यात येईल, सत्ताधार्‍यांच्या जेवणावर विरोधी मंडळाचा बहिष्कार असून सत्ताधार्‍यांनी काही केले तरी त्यांचा टांगा पल्टी होणार आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात सर्व संटघना एकवटल्या आहेत. शिक्षक बँकेत चेअरमनऐवजी नेत्यांनी घोषणा करण्याची नवीन चुकीची परंपरा सुरू झाल्याचा आरोप ठुबे यांनी केला.

नैराश्यापोटी ठुबे यांनी आरोप : शिरसाठ
सभासदांच्या हितासाठी कर्जावरील व्याजदर कमी केला, तसेच मयत झाल्यास डीसीपीएस बांधवांना कुटुंब आधार निधी योजनेतून 21 लाखांची मदत जाहीर केली. तसेच ना परतावा 750 रुपयांचा निधी थांबवला आणि याच वेळी सभासदांच्या खात्यावर 6.10 टक्के लाभांश जमा झाल्याने सभासद खुश झाले. नैराश्यापोटी ठुबे यांनी आरोप केल्याचे अर्जुन शिरसाठ यांनी सांगितले.

सभेतील निर्णय
– डीसीपीएस शिक्षकांसाठी कुटुंब आधार निधी 21 लाख
– शैक्षणिक, वाहन व गृह कर्ज 7 टक्के
– जामीन कर्जाच्या व्याजदरात 0.15 टक्के कपात, यापुढे 8.25 व्याजदर
– आचार्य दोंदे पुरस्कारामध्ये दुप्पट वाढ
– कर्ज मर्यादेत 5 लाखांची वाढ

ताज्या बातम्या

सेन्सेक्स

सेन्सेक्स-निफ्टीवर संकटाचे ढग; चार दिवसांत ‘इतक्या’ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या...

0
मुंबई | Mumbaiभारतीय शेअर बाजारात गेल्या काही सत्रांपासून सुरू असलेली विक्री मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजीही कायम राहिली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका-इराणमधील तणाव, अमेरिकेतील...