Sunday, September 6, 2026
HomeनगरAhilyanagar : गुरूजींच्या सभेत आता शिक्षिकाही एकमेकींना भिडल्या!

Ahilyanagar : गुरूजींच्या सभेत आता शिक्षिकाही एकमेकींना भिडल्या!

शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळाचा परंपरा कायम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत पुरूष शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून महिला शिक्षक देखील मैदानात उतरल्याचे दिसून आले. रविवार नगरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी महिलांच्या विरोधात आक्रमकपणे विरोधी गटाच्या महिला एकमेंकावर धावून जात ‘खुन्नस’ दिल्याचे दिसले. सभेत अनेक वेळा सत्ताधार्‍यांच्या विरोधात विरोधी मंडळाच्या नेत्यांनी गोंधळ घातल्याने शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण यंदा देखील वाद, गोंधळ, आरोपांची परंपरा कायम असल्याचे दिसले.

विशेष म्हणजे यंदा व्यासपिठावर महिला शिक्षकांनी माईक आणि त्याची वायर आणि तसेच व्यासपिठावर असलेला स्टीलचा डेक्स याची ओडाताण केली. यावेळी महिला शिक्षकांमध्ये चांगली झोंबाझोंबी दिसून आली. या गाेंंधळात काहींनी एकमेकींना बोचकारल्याचा आरोप करत ‘हमी है, जोश मे’ची आठवण करून दिली. सभेत सत्ताधारी व विरोधी गटाने आपआपली सरशी झाल्याचा दावा केला असला तरी बँकेच्या सत्तेच्या मोहताच पुन्हा शिक्षकांच्या वादाच्या गोंधळाच्या भूमिकेवर प्रश्न उभा केला आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107 वी सर्वसाधारण सभा रविवारी नगर-कल्याण रोडवरील एका लॉनमध्ये पार पडली. यावेळी सभेच्या सुरूवातीला सत्ताधारी गटाच्या महिला शिक्षकाने विरोध करणार्‍या महिला शिक्षकांना ‘चिमूटभराचा विरोध’ असे जाहीरपणे हिनवले. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी गटाच्या महिलांनी व अन्य सर्व विरोधकांनी व्यासपिठासह सभागृहात गोंधळ घातला. यावेळी सभेला उपस्थित असणार्‍या महिलांना चिमुठभर म्हणत हिनवल्याचा आरोप करण्यात आला. विरोधी गटाच्या नगर तालुक्यातील नेत्या महिला नेत्या स्वाती गोरे यांनी थेट व्यासपिठावर धाव घेत माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत जयश्री झरेकर, अंजली महामेर, उषा बांडे, विद्या एरंडे आणि अन्य महिला व्यासपिठावर पोहचल्या. यावेळी महिलांना हिवणार्‍या सत्ताधारी गटाच्या महिला नेत्याला तावातावात जाब विचारण्यात आला. यावेळी सर्वच महिला पुरूषांप्रमाणे आक्रमक असल्याचे दिसून आले. अखेर सत्ताधारी गटाच्या नेत्या विद्युलता आढाव मदतीला धावून गेल्या. यावेळी सत्ताधारी आढाव आणि विरोधी गोरे यांच्यात चांगलीच चमक उडाली. दोनही गटाकडून एकमेंकावर आरोपसह बोचकरल्याचा आरोप झाला.

सभेत झालेला गोंधळ आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहून संचालक मंडळासह सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सर्व महिलांची दिलगीरी व्यक्त सभेच्या कामकाजातून ‘चिमूटभर महिला’ हा शब्द वगळण्यात येईल असे जाहीर केले. त्यानंतर गोंधळ काही काळ शमला. यावेळी स्वाती गोरे यांनी आम्ही आमच्या पैशाने सभेसाठी आलेलो आहोत. गाडी करून पैसे देवून आम्ही लोके आणलेले नाहीत, असा आरोप केला. सभेत त्यानंतर मनिषा वाकचौरे, शदर निवडुंगे, स्वाती काळे, दीपाली रेपाळे, मनिषा चाबूकस्वार यांचे मनोगत झाले. शिक्षक नेते प्रवीण ठूबे, अविनाश निंभोरे, नवनाथ अडसूळ, नारायण राऊत, बाबुराव कदम, सचिन नाबगे, नारायण पिसे, सुरेश निवडुंगे, अर्जुन शिरसाठ यांच्यासह अन्य नेत्यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला. सभेत सत्ताधारी गटाचे नेते बापू तांबे यांनी विरोधकांचा समाचार घेत विविध घोषणा करत विरोधकांचा समाचार घेतला.

व्यासपिठासमोर गोंधळ, धावाधावी
शिक्षकांच्या सर्वसाधारण सभेत अनेक वर्षापासून सुरू असणारा गोंधळ, एकमेंकावर धावून जाण्याची परंपरा, एकाच वेळी अनेकांची बोलण्याची सवय, सभेत अर्व्वाच भाषेचा वापर आणि हमरी-तुमरची प्रथा यंदा देखील कायम असल्याचे दिसून आले. सभेत अनेक वेळा विरोधक एकत्र येत व्यासपिठसमोर गोंंधळ घालत होते. तसेच सत्ताधारी गटातून महिला चेअरमन यांच्याऐवजी संचालक विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतांना दिसून आले.

विरोधकांची दोनदा प्रती सभा
शिक्षक बँकेची सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी गटाच्यावतीने आधी सुमारे 20 मिनिट तर जेवणासाठी ब्रेक घेतल्यानंतर सभागृहात प्रती सभा घेतली. यावेळी विरोधी गटाचे शिक्षक हजर होते. सत्ताधारी गटावर आरोप करतांना विरोधकांना यंदा बोलण्याची संधी देण्याचे टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

शेड्यूल बँकेचा विषय स्थगित- दुसूंगे
शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत पहिल्या अर्ध्यातासात मोठा गोंधळ झाल्याचे पाहून सत्ताधारी गटाचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष संतोष दुसूंगे यांनी व्यासपिठाचा ताबा घेतला. तसेच शिक्षक बँकेला मोठी परंपरा असून बोलण्याच्या ओघात कोणी काहीही बोलले असले तरी संचालक मंडळाने माफी मागीतलेली आहे. यामुळे कोणीच गोंधळ घालू नका. सर्वसाधारण सभेतील शेड्यूल बँकेच्या विषयावर चर्चा करून त्यावर पुन्हा निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी केली. त्यास सभागृहाने संमती दिल्यानंतर सभेतील गोंधळ निवळला.

त्या महिला शिक्षिकेवर कायदेशीर कारवाई करणार- दुसुंगे
सर्वसाधारण सभेत विरोधकांनी नगर तालुक्यातील गुंडेगाव केंद्रातील स्वाती गोरे यांना पुढे करून गोंधळ घातला. त्यांना बँकेच्या कामकाजाची माहिती नव्हती. मात्र, विरोधकांनी त्यांना पढवून आणून गोंधळाला सुरुवात केली. त्यांनी गोंधळ घातल्यामुळे शांततामय वातावरणात पार पडणार्‍या सर्वसाधारण सभेला गालबोट लागले. त्यांनी माईकची ओढाताण करून माईक तोडला. गोंधळामुळे बँकेची बदनामी झाली. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी सांगितले.

महिलांनी हिसवाला माईक

सभेत सुरूवातील महिला शिक्षकांना बोलण्याची संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. काही महिलांना बोलण्याची संधी दिल्यानंतर राजेंद्र जरे हे व्यासपिठावर बोलण्यासाठी आले. मात्र, जरे मधेच आल्याचा आरोप करत काही महिला त्यांच्याकडील माईक हिसकावू लागल्या. यावेळी माईकची ओढताण होवून त्याची वायर तुटली. अखेर रविंद्र पिंपळे यांनी जरे यांना व्यासपिठाखाली नेले आणि तणाव कमी झाला.

शिक्षिकेला भोवळ

सभा ऐन रंगता आलेली असतांना व्यासपिठासमोर बसलेल्या एका महिला शिक्षकांला अचानक भोवळ आली. अखेर संबंधीत शिक्षिकेला सभागृहातून बाहेर नेण्यात आले. यामुळे सभेत काही काळ काय सुरू हे कोणालाच कळाले नाही. यंदाच्या सभेला मोठ्या संख्याने महिला सभासदांची उपस्थिती दिसून आली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...