Monday, June 24, 2024
Homeनगरजिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 14 हजार 642 मतदार

जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 14 हजार 642 मतदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्ह्यात 14 हजार 642 मतदार आहेत. येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असून या निवडणुकीची आचारंसहिताही आता लागू झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली. लोकसभा निवडणुकीची 4 जूनला आचारसंहिता संपल्यावर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे या मतदारसंघाच्या मतमोजणीपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी उपस्थित होते. केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांसाठी निवडणूक होत असून यासाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील

(मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे 7 जुलै 2024 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 15 मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 22 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. छाननी 24 मे रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 27 आहे. 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदार संघाकरिता मतदान होईल. 13 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात 14 हजार 642 मतदार आहेत. त्यापैकी 10 हजार 270 पुरूष तर 4 हजार 372 महिला मतदार आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 2 हजार 49 मतदार आहेत. जामखेड तालुक्यात सर्वात कमी 332 मतदार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही मतपत्रिकेवर होणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रमांक मतदारांना द्यावा लागणार आहे. या मतदार संघासाठी पसंतीक्रमांकाने निवडणूक घेतली जात आहे.

तालुकानिहाय मतदार (कंसात महिला मतदार)
अकोले 981 (254), संगमनेर 2 हजार 49 (577), राहाता 1 हजार 374 (499), कोपरगाव 1 हजार 566 (566), श्रीरामपूर 923 (358), नेवासे 871 (169), शेवगाव 786 (149), पाथर्डी 886 (176), राहुरी 798 (207), पारनेर 692 (181), नगर शहर 1 हजार 453 (700), नगर ग्रामीण 527 (122), श्रीगोंदे 782 (196), कर्जत 622 (152), जामखेड 332 (66).

येत्या 12 मेपर्यंत शिक्षक मतदार संघात नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. त्यांच्या नावाची पुरवणी यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर कोणाचे नाव नोंदविले जाणार नाही. मागील वेळेस या मतदारसंघात 13 हजार 639 मतदार होते. यंदा त्यात वाढ झालेली आहे.
-राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग)

- Advertisment -

ताज्या बातम्या