Saturday, July 27, 2024
Homeनगरशिक्षक मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज

शिक्षक मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज

नगरमधून कोण रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे घमासान आज शुक्रवारपासून (दि. 31) सुरू होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातून तब्बल पाच जण इच्छुक आहेत. यापैकी कितीजण प्रत्यक्ष रिंगणात उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, शिक्षक लोकशाही आघाडीची (टीडीएफ) चार तुकडे झाले असून, या चारही गटांचे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात नगर जिल्हातील दोन उमेदवार अपेक्षित आहेत.

- Advertisement -

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक 26 जूनला होणार आहे. पसंती क्रमांकानुसार मतदान असलेल्या या निवडणुकीत सुमारे 65 हजार मतदार आहेत. नगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या मतदार संघाचे आहे. सध्या या मतदारसंघाची आमदारकी नाशिकचे किशोर दराडे यांच्याकडे आहे. ते मागच्यावेळी 2018 मध्ये अपक्ष निवडून आले असले तरी त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे ठाकरे सेनेचे आमदार आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणारे किशोर दराडे यांच्यामागेही ठाकरे सेनेची ताकद असल्याचे सांगितले जाते.

टीडीएफच्या एका गटाने माध्यमिक शिक्षक सोसायटीचे भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी घोषीत केली आहे. तर दुसर्‍या गटाने अप्पासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय डॉ. राजेंद्र विखे, विवेक कोल्हे व राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष श्रीगोंदे तालुक्यातील दत्ता पानसरे असे अन्य तीनजण रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. संस्थाचालकांपैकी विखे व कोल्हे हे भाजपला मानणारे आहेत तर पानसरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे समर्थक आहेत. त्यामुळे महायुतीमध्येच या उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या आतापर्यंतच्या सहा निवडणुकांपैकी तब्बल पाच निवडणुका शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) जिंकल्या आहेत.

पण यंदा या आघाडीचे चार तुकडे झाले आहेत. टीडीएफमधील निवृत्तांच्या गटाने भाऊसाहेब कचरे यांना, नाशिक टीडीएफ गटाने संदीप गुळवे यांना व धुळे टीडीएफ गटाने निशांत रंधे यांना तर कार्यरत गटाच्या टीडीएफने नगरचे अप्पासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 37 वर्षांपूर्वी नगरचे आ. रा. ह. शिंदे या मतदार संघात आमदार होते. 1982 ते 88 या काळात त्यांनी आमदारकी भूषवली. मात्र, त्यानंतर नगर जिल्ह्याला या मतदार संघाची आमदारकी भूषवण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान, ज्यांची 15 वर्षे शिक्षक म्हणून नोकरी झाली आहे व जे आताही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, अशांना शिक्षकांनी आमदारकीची मतदानातून संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी विभागीय स्तरावर 24 बाय 7 आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीबाबत काही तक्रारी व शंका असल्यास नागरिकांनी 0253- 2469412 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नायब तहसीलदार (रोहयो) तथा आचार संहिता कक्ष नियंत्रण अधिकारी विवेक उपासनी यांनी सांगितले. या दूरध्वनी क्रमांकावर नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या