अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात 36 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाने या मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केला आहे. असे असतानाही संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महायुतीचे तीन उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बुधवारी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांच्यासह टिडीएफचे भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, रणजित बोठे हे शिक्षक नेते निवडणूक रिंगणात राहिले आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 36 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे. मंगळवारी चार उमेदवारांनी माघार घेतली होती. अशा एकूण 15 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 उमेदवार राहिले आहेत. Dr. Rajendra Vikhe
या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करताच डॉ. राजेंद्र विखे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक रंगणार असे वाटत होते. मात्र अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विखेंनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सहाजिक कोल्हे हे एकमेव संस्था चालक उमेदवार राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी कुंडलिक जायभाये, दत्तात्रय पानसरे, रखमाजी भड, सुनील पंडित, बाबासाहेब गांगर्डे, अविनाश माळी, निशांत रंधे, दिलीप पाटील, डॉ. राजेंद्र विखे, धनराज विसपूते व प्रा. भास्कर भामरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
त्यामुळे या निवडणुकीत आता 21 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यात किशोर दराडे (शिवसेना), अॅड. संदीप गोपाळराव गुळवे (ठाकरे सेना), अॅड. महेंद्र भावसार (राष्ट्रवादी अजित पवार गट), भागवत गायकवाड (समता पक्ष) यांच्यासह अपक्ष म्हणून अनिल तेजा, आप्पासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागर कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरूडे, रतन चावला, संदीप गुळवे (पाटील) हे निवडणूक रिंगणात राहिले आहेत.